सोलापूरच्या परिवहन सेवेला येणार अच्छे दिन; केंद्राकडून ७० मिनी ई-बस अन् ३० अन्य बसेस मंजूर
By Appasaheb.patil | Published: July 13, 2024 01:14 PM2024-07-13T13:14:11+5:302024-07-13T13:15:02+5:30
सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली.
सोलापूर : सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला अच्छे दिन आले असून नुकतीच एक गुड न्यूज सोलापूरकरांसाठी मिळाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात आता नव्या ७० ई-बस व ३० नियमित आकाराच्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत. केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचला वरील माहिती पत्राद्वारे कळवली असल्याचे सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आली होती. गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. २००४ साली जवळपास दीडशे बसेस केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या, त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत. आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयमार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर २०२३ मध्ये १०० ई बसेस मंजूर झाल्या होत्या.
सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी, सलग सरळ रस्त्यांची लांबी, टर्निंग रेडियस, वळणं या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई-बस चालणार नाहीत, त्या ऐवजी मिडीबस उपयुक्त आहेत, अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर केंद्राच्या कमिटीने खास सोलापूरसाठी ७० मिनी बस मंजूर केल्या व ३० नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या आहेत.