‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’मध्ये सोलापूरची शून्याकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:40 AM2019-12-04T11:40:24+5:302019-12-04T11:42:33+5:30
जागतिक एड्स जनजागृती सप्ताह विशेष : नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट, ०़७२ टक्के प्रमाण
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : २००८ साली सोलापुरात शंभर लोकांमागे १७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळायचे़ म्हणजे पॉझिटिव्हचे प्रमाण सरासरी १७ ते १८ टक्के इतके होते़ शासनाच्या जनजागृती आणि मोफत औषधोपचार कार्यक्रमांमुळे नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ सध्या नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ०़७२ टक्के इतके आहे़ सोलापूरची वाटचाल गेटिंग टू झीरो अर्थात शून्याकडे सुरू आहे, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
शासन सध्या गेटिंग टू झीरो अर्थात शून्य गाठायचंय हा उपक्रम राबवत आहे़ यात राज्याचे प्रमाण ०़५ टक्के इतके आहे़ राज्याची वाटचाल देखील शून्याकडे सुरू आहे़ चालू वर्षात सातशे नवीन एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत़ काही वर्षांपूर्वी हीच संख्या तीन ते चार हजारांवर होती़ एचआयव्हीमध्ये सोलापूर जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे़ सध्या सोलापूर जिल्ह्यात सोळा हजार एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आहेत़ यात साडेबारा हजार रुग्ण हे शासकीय रुग्णालयाकडून औषधोपचार घेताहेत, तर उर्वरित रुग्ण इतर खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत.
पूर्वी शासनाकडून एकाच वेळी महिनाभरासाठी गोळ्या दिल्या जायच्या़ आता तीन महिन्यांकरिता गोळ्या दिल्या जातात़ त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास कमी झाला आहे़ बार्शी, पंढरपूर तसेच सोलापूर या ठिकाणी मोफत औषधोपचार केला जातो़ भगवान भुसारी यांनी सांगितले, जागतिक आरोग्य संघटनेकडून एचआयव्ही रोखण्यासाठी जोरदार जनजागृती मोहीम सुरू आहे़ संघटनेकडून प्रतिवर्षी एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी तब्बल १६३ हजार कोटी रुपये खर्च होतात़ यातील दोन हजार कोटी रुपये फक्त भारतावर खर्च केला जातात़ एचआयव्हीबाबत लोकांची मानसिकता बदलली असून, समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे़ यामुळे एचआयव्हीमुक्त सोलापूरकडे वाटचाल सुरू आहे़
मदर टू चाईल्डचे प्रमाणही घटले
- एचआयव्ही पॉझिटिव्ह गरोदर मातेपासून बाळास एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता अधिक असते़ लागण होऊ नये, याकरिता मातेने विशेष काळजी घेतल्यास बाळ निगेटिव्ह जन्म घेऊ शकते़ पूर्वी मदर टू चाईल्डचे प्रमाण अकरा टक्के होते़ आता हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. सोलापुरात पूर्वी ३० ते ४० मुलं जन्मत: एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळायचे़ आता दोन ते चार बाळ हे पॉझिटिव्ह आढळतात़ मागील तीन वर्षांत सरासरी तीन टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्ह मुले जन्मली़ अपवाद या वर्षीचा आहे़ या वर्षी आठ मुले पॉझिटिव्ह जन्मली आहेत आणि राज्यात हेच प्रमाण सरासरी ५ टक्के इतके आहे़