रस्त्यावर विनापरवाना डुलणाºया तळीरामांमुळे सोलापुरातील मद्यविक्रेते रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:44 PM2018-11-20T12:44:43+5:302018-11-20T12:50:35+5:30
आॅनलाईन सुविधेचा बोजवारा : फक्त ५ टक्के ग्राहक पाळतात नियम
सोलापूर : विनापरवाना मद्य पिऊन रस्त्यावर डुलणाºया तळीरामांमुळे सोलापूर शहरातील मद्यविक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे मद्य पिण्याचा परवाना नसणाºया ग्राहकांना विक्री करणे, मद्य विक्रेत्यांसाठी घातक ठरले आहे.
देशी-विदेशी मद्य पिणे, खरेदी करणे आणि जवळ बाळगणाºयांवर कारवाई होऊ शकते. मात्र त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन कायदेशीर परवाना काढता येतो. हा परवाना काढण्यासाठी अनेक जण संकोच करीत असल्याने आॅनलाईन सोय करण्यात आली आहे. त्यासाठी आधार कार्ड क्रमांक या एकाच पुराव्याची गरज असून, त्याद्वारे कायमचा, एक वर्षाचा आणि एक दिवसाचाही परवाना उपलब्ध आहे. सोलापुरात मात्र परवाना न पाहताच सर्रास मद्याची विक्री होते. फक्त ५ टक्के ग्राहक नियमाचे पालन करतात, असे समजते.
कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री करण्यासाठी विक्रेत्याला परवान्याची गरज असते. त्याबरोबरच त्याच्याकडून मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडेही परवाना असणे बंधनकारक आहे. त्याबाबत व्यापक कारवाई होत नसली, तरी परवाना नसताना मद्य खरेदी करणे, जवळ बाळगणे आणि पिणे ही कृती बेकायदेशीरच ठरते. मद्य खरेदी करणाºयांपैकी जवळपास ९५ टक्के नागरिकांकडे कायदेशीर परवाना नसतो. मद्याचा परवाना काढणे म्हणजे समाजात वेगळीच प्रतिमा निर्माण होईल, या भीतीपोटी परवाना काढण्याकरिता कार्यालयात जाण्यास बहुतांश नागरिक संकोच करतात. मात्र, आता हा परवाना आॅनलाईन मिळत असला तरी याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर विभागाच्या वतीने देण्यात येणाºया सर्व आॅनलाईन सेवा उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर नाव, मोबाईल क्रमांक आदी तपशील देऊन नोंदणी (लॉग इन) केल्यास आॅनलाईन सेवेचा लाभ घेता येतो. आॅनलाईन सेवांमध्ये हव्या असणाºया परवान्यावर क्लिक केल्यास अर्ज दिसतो.
हा अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता आदी तपशिलांबरोबरच आधार क्रमांक आणि एका डिजिटल छायाचित्राची आवश्यकता असते. कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये, वर्षभराच्या परवान्यासाठी शंभर रुपये, एक दिवसासाठी ५ रूपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत.
वाईनशॉप चालकांमध्ये खळबळ
- मद्य पिण्याचा परवाना नसताना विक्री केल्याप्रकरणी संत तुकाराम चौकातील लिना वाईन शॉपवर सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी १३ नोव्हेंबर रोजी कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अहवाल व पोलीस कारवाईचा अहवाल एसीपी काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविला आहे. या अहवालावरून संबंधित वाईन शॉपवर कारवाई होणार आहे. या प्रकारामुळे शहरातील अनेक वाईनशॉपमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्यथा होते दंडात्मक कारवाई : बिरादार
- आॅनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर सात दिवसांच्या आत परवाना आॅनलाईन पद्धतीनेच दिला जातो. आपल्या परवान्याचे काम कुठवर आले, हे तपासण्याबरोबरच ‘स्टेटस’ या पयार्यात परवाना उपलब्ध होतो. तो संबंधिताला डाऊनलोड करून घ्यावा लागतो. एक दिवसाचा परवानाही आॅनलाईन मिळू शकतो. मात्र, हा परवाना थेट परमिट रूम किंवा मद्य विक्रीच्या ठिकाणी पाच रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. विना परवाना मद्य पिणाºयास व विक्री करणाºयावर न्यायालयातून दंडात्मक कारवाई होऊ शकते अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण बिरादार यांनी लोकमतशी बोलताना दिली.