सोलापूर महापालिकेच्या सोरेगाव, देगाव प्रकल्पातून तयार होणार सौर ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 10:40 AM2021-10-05T10:40:23+5:302021-10-05T10:40:34+5:30
महापौरांच्या हस्ते लोकार्पण: राज्यातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा
सोलापूर : महापालिकेचे सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि देगाव येथील मलनिस्सारण केंद्रातून दररोज सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राज्यात कार्यान्वित झालेले हे पहिलेच यशस्वी प्रकल्प असल्याचा दावा सोमवारी मनपा प्रशासनाने केला.
सोरेगाव आणि देगाव येथील या प्रकल्पांचे उद्घाटन सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, सभागृह नेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, चेतन नरोटे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी ७५३.०६ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. देगाव येथील मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी ९९८.६३ किलो वॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते; परंतु सोलापुरात सर्वात प्रथम हे प्रकल्प कार्यान्वित झाल्याचा आनंद असल्याचे महापौर यन्नम यांनी सांगितले.
मनपाला काय फायदा
देगाव मलनिस्सारण केंद्रातील प्रकल्पातील वीज निर्मितीमुळे दर महिन्याला ६ लाख ४६ हजार ७९० रुपयांची वीज बिल बचत होईल. सोरेगाव येथील प्रकल्पातून दर महिन्याला ४ लाख ८७ हजार रुपयांची वीज बिल बचत होईल. वीज बिलातून बचत झालेला पैसा शहरातील इतर विकासकामांवर खर्च करता येईल, असे संजय धनशेट्टी यांनी सांगितले.
----
साैर ऊर्जा ही काळाची गरज आहे. पालिकेने सौर ऊर्जा निर्मितीमध्ये पुढचे पाऊल टाकल्याचा आनंद आहे. वीज बिलात बचत करण्यासोबत विजेबाबत पालिका स्वयंपूर्ण होत आहे. या प्रकल्पातील इतर कामेही लवकरच पूर्ण केली जातील.
- पी. शिवशंकर, आयुक्त.
-----