स्मार्ट सिटीतून मिळणार सोलापूर जिल्हा परिषदेला सौरऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:15 PM2018-10-29T16:15:16+5:302018-10-29T16:16:46+5:30
प्रक्रिया सुरू: साडेतीन कोटी खर्च वाचला, प्रस्ताव सभेपुढे येणार
सोलापूर : केंद्र सरकारने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीच्या इमारतीला सौरऊर्जा संयंत्र पुरविण्यात येणार आहे. यामुळे झेडपीने सेस फंडातून सौरउर्जेसाठी केलेले साडेतीन कोटी रुपये वाचणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी मिनी मंत्रालय असलेली झेडपी अनेक योजना राबवित असते. गावे, वाड्या-वस्त्यांवरील लोकांना रात्री प्रकाश मिळण्यासाठी झेडपीने अनेक सौरदिवे वाटप केले आहेत.आता प्रत्यक्ष झेडपीला स्मार्ट सिटी योजनेचा लाभ मिळणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका हद्दीत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयावर सौरऊर्जा संयंत्र बसविण्याची योजना आहे. यानुसार सध्या महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, हुतात्मा स्मृती मंदिर, आयुक्त निवास, मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर विद्यापीठ, सायन्स सेंटर या ठिकाणी सौरऊर्जा संयंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायालय, सिव्हिल हॉस्पिटल, आकाशवाणी केंद्र, शासकीय विश्रामधाम या ठिकाणी सौरऊर्जा बसविण्याचा प्रस्ताव आहे. यातील फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा ना हरकत दाखला मिळाला आहे. इतर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न आल्याने काम थांबले आहे.
महापालिकेप्रमाणेच झेडपी ही स्थानिक स्वराज संस्था आहे. त्यामुळे झेडपीला ही योजना राबविता येते काय याबाबत संभ्रम होता. त्यामुळे झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी महापालिकेचे आयुक्त तथा सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यावर डॉ. ढाकणे यांनी स्मार्ट सिटीतून झेडपीलाही सौरऊर्जा संयंत्र पुरविणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीला सौरऊर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा प्रस्ताव सभेपुढे ठेवून मंजुरी मिळाल्यावर स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात येईल अशी माहिती सीईओ डॉ. भारुड यांनी दिली.
सीईओंचा साडेतीन कोटी खर्चाचा प्रस्ताव
- झेडपीच्या इमारतीसाठी सौरऊर्जा बसविण्यासाठी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सुमारे साडेतीन कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता. झेडपीची मुख्य इमारत व शिक्षण, आरोग्य विभागाच्या इमारतीवर सौरऊर्जा संयंत्र बसवून विजेची बचत करण्याचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची प्रशासनाने तयारी केली असताना स्मार्ट सिटी योजनेने झेडपीला तारले आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीला सौरऊर्जा संयंत्र मिळत असेल तर ही चांगली बाब आहे. अद्याप या प्रस्तावाबाबत माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही. पण प्रस्ताव आलाच त्याला मंजुरी देण्यास काहीच हरकत नाही.
-संजय शिंदे
अध्यक्ष, झेडपी