पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ४० गावात सोलर पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:46 AM2018-05-11T11:46:23+5:302018-05-11T11:46:23+5:30
विजेची व बिलाची होणार बचत: १० तालुक्यातील गावांचा समावेश
सोलापूर: जिल्ह्यातील ४० गावांच्या पिण्याच्या स्रोतावर सोलर पंप बसविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, त्याचे काम सुरू झाले आहे. ५ हॉर्सपॉवरचे पंप बसविल्यानंतर विजेची व बिलाची बचत होणार आहे.
सध्या विजेच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर होत आहे. वीज असेल तरच गावकºयांना पिण्याचे पाणी मिळते, वीज नसेल तर पाणीपुरवठा ठप्प होतो. याला पर्याय सोलर असून, प्रस्ताव आलेल्या जिल्ह्यातील ४० गावात सोलर पंप बसविले जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात चिंचोळी, मानेगाव, उपळाई बु., सापटणे बु., मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी, भाळवणी, लेंडवेचिंचाळे, सोड्डी, उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ, पडसाळी, हगलूर, पाकणी, बार्शी तालुक्यातील धानोरे, गोळवेवाडी, खामगाव, राळेरास, नारीवाडी, दक्षिणमधील औज मं., कारकल, मंद्रुप, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव, सिन्नूर, कलहिप्परगा, सांगोल्यातील कडलास, चोपडी, बलवडी, वाडेगाव, करमाळा तालुक्यातील पांगरे, अंजनडोह, निमगाव, पाडळी, टाकळी, आवाटी, मोहोळ तालुक्यातील पापरी, बिटले, अनगर, खंडोबाचीवाडी, पंढरपूर तालुक्यातील करकंब, खर्डी, बाभुळगाव आदी गावात हे सौर पंप बसविले जाणार आहेत.
आमच्या गावात सध्या हापशावर एक एच.पी.चे चार सोलर पंप बसविले आहेत व सध्या ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. नागरिकांना वीज नसतानाही पाणी मिळत असल्याने पाण्याची अडचण दूर झाली आहे. नव्याने विहिरीतून पाणी उपसणारा सोलर पंप मंजूर झाला आहे.
- अंकुश गुंड, सरपंच, अनगर मोहोळ
मंजूर झालेल्या गावात जाऊन सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीकडून जागा निश्चितीचे फॉर्म भरून घेतले जात असून, प्रत्यक्षात मे अखेरला कामाला सुरुवात होईल. महिनाभरात पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला जाईल.
- सौरभ कुंभार, व्यवस्थापक, सोयो सिस्टीम, जळगाव