सोलापूरच्या गणेशमूर्तीची पेणला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:59 PM2017-08-23T12:59:06+5:302017-08-23T12:59:51+5:30
सोलापूर दि २३ : महाराष्टÑात पेणचा गणपती प्रसिद्ध आहे. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. राज्यभर गणेश मूर्तीची मागणी असलेल्या पेणमधून सोलापूरच्या गणपतीला दरवर्षी मागणी असते. पूर्व भागातील मूर्तिकार जनार्दन शेट्टी यांच्या मूर्ती गेल्या आठ वर्षांपासून पेणला नित्यनियमाने जातात.
महेश कुलकर्णी : लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : महाराष्टÑात पेणचा गणपती प्रसिद्ध आहे. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. राज्यभर गणेश मूर्तीची मागणी असलेल्या पेणमधून सोलापूरच्या गणपतीला दरवर्षी मागणी असते. पूर्व भागातील मूर्तिकार जनार्दन शेट्टी यांच्या मूर्ती गेल्या आठ वर्षांपासून पेणला नित्यनियमाने जातात.
रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव गणेश मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे घरोघरी मूर्ती बनविण्याचे काम होते. कमी उंची असलेल्या आणि घरोघरी प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येणाºया मूर्ती पेणला बनतात. त्याहीपेक्षा रेखीव आणि सुरेख मूर्ती सोलापुरात शेट्टी कुटुंबाकडे बनविल्या जात असल्यामुळे ही मागणी असते. तेथे निर्यात केलेल्या मूर्ती मुंबईला विक्री करण्यात येतात. ६० वर्षांपासून जनार्दन शेट्टी या क्षेत्रात आहेत. सोलापुरातील आद्यमूर्तिकार शिवाजी गाजूल यांच्याकडून ही कला आत्मसात केलेल्या शेट्टी यांचे अख्खे कुटुंब हे काम करते. सुबक, आकर्षक आणि रेखीव अशा मूर्ती येथे बनण्याचे कारण म्हणजे वर्षभर हे काम चालत असते. अनेक मूर्तिकार गणपती उत्सवाच्या आधी काही महिने हे काम सुरू करतात. परंतु जगन्नाथ शेट्टी कुटुंबातील जवळपास १३ सदस्य वर्षभर हे काम करतात. मुलगा रघुनाथ, गिरीश आपल्या पत्नी आणि मुुलासह हे काम करीत असल्यामुळे दर्जाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जात नाही.
पुणे आणि मुंबईच्या भक्तांची दगडूशेठ आणि लालबागचा राजा या गणपतीवर श्रद्धा असल्याने या मूर्तीसारखी प्रतिकृती असलेले गणपती शेट्टी यांच्याकडे तयार होतात. त्यांना पुणे आणि मुंबईहून मोठ्या प्रमाणात मागणी असते. वर्षभरात ९ हजार गणेश मूर्ती शेट्टी कुटुंबीयांकडून केल्या जातात. या सर्व गणपतींची वर्षभर आधी मागणी नोंदविली जाते. देवी आणि गौरीच्या मूर्तीही येथे बनतात.
-------------------------
२०० इको फ्रेंडली मूर्ती
कर्नाटकातील बंगळुरूला शेट्टी यांच्या मूर्ती दरवर्षी जातात. कर्नाटक सरकारने प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणल्याने यावर्षी २०० इको फ्रेंडली मूर्ती त्यांनी बनवून दिल्या आहेत. शाडूपासून बनविलेल्या या मूर्तीला बनविण्यास वेळ लागतो.
--------------------
सुभाष गणपतीला मागणी
घरगुती गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी शास्त्रशुद्ध मूर्ती बघून घेतल्या जातात. जनार्दन शेट्टी यांनी ४० वर्षांपूर्वी सुभाष (शुभ) गणपती तयार केलेला आहे. पिवळे पितांबर, भगवी शाल आणि उजवा पाय पुढे असलेल्या गणपतीला मोठी मागणी आहे. दरवर्षी अशा हजार मूर्तींची मागणी त्यांच्याकडे येत असते.