सोलापूरच्या लोकअदालतीत ९७५ प्रकरणे तडजोडीने निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:32 PM2018-07-15T17:32:37+5:302018-07-15T17:33:49+5:30
महाराष्टÑ विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत पार पडली.
सोलापूर: सोलापूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शहर आणि जिल्ह्यातील न्यायालयात राष्टÑीय लोकअदालत पार पडली. यामध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९,३२८ प्रकरणांपैकी ९७५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. याशिवाय ४ कोटी ९१ लाख ५१ हजार ६१७ एवढ्या रकमेची वसुली झाली.
महाराष्टÑ विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत पार पडली. यामध्ये २८०७ प्रलंबित प्रकरणे व ६,५२१ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ९,३२८ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६०० प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली व ३७५ दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड झाली.
या लोकन्यायालयासाठी जिल्ह्यात एकूण ३१ पॅनलची सोय करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, भू-संपादन, दरखास्त व कलम १३८ चलनक्षम कायद्याची तसेच कौटुंबिक वाद आदी न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि बँका, टेलिफोन कंपनी, वीज महावितरण, महानगरपालिका, वित्तीय संस्था यांची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
हे लोकन्यायालय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वकील संघटना व पक्षकार यांच्या सहकार्याने पार पडले. सोलापूर जिल्हा न्यायालयातील पॅनलवर न्यायाधीश डी.के. अनभुले, एस. एम. पाटील, यू. एल. जोशी, वाय. जी. देशमुख, आर. व्ही. सावंत-वाघुले, एस. व्ही. देशपांडे, न्यायिक अधिकाºयांनी काम पाहिले. यासाठी न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ, विधी संस्थांचे अधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक दौलत सीताफळे, आर. व्ही. रंपुरे, अंबादास मच्छा, व्ही. एस. चिकमणी, ए. बी. शेख यांनी परिश्रम घेतले.