'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:14 PM2019-04-20T15:14:09+5:302019-04-20T15:14:58+5:30
भाजपने 2014 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, सपनों को सौदागर दिला होता.
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी माढ्यातील सभेत रणजीतसिंह मोहिते पाटलांना टोला लगावला. माढ्यातले काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला. काय कमी केलं होतं पवार साहेबांनी यांच्यासाठी? इथली जनता राष्ट्रवादीवर, पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. येत्या 23 मे रोजी माढ्यातली जनता सर्व हिशोब करणार असल्याचेही मुंडेंनी म्हटले.
भाजपने 2014 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, सपनों को सौदागर दिला होता. या सौदागरने सर्वांना फसवले. भाजपने शेतकऱ्यांना फसवले, कष्टकऱ्यांना फसवले, दलितांना फसवले, धनगरांना फसवले. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत सांगितले की, भाजपला मतदान करा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आज पाच वर्षे झाली तरी तो सोनेरी दिवस उजाडला नाही. त्यांनी आरक्षण तर दिलेच नाही उलट धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईलच हरवल्याची कबुली कोर्टात दिली. फसवणीस सरकारचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे आवाहनही धनंजय मुंडेंनी सभेत बोलताना केलं. तसेच, ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या विषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांसारख्या आरोपीस लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या निर्णयाची लाज वाटत नाही का, असा सवालही विचारला.