कुणाला कर्करोग, कुणाला किडनीचा आजार, हृदयरोग; जि.प. कडून रुग्णांना १४ लाखांची मदत
By शीतलकुमार कांबळे | Published: May 3, 2023 02:04 PM2023-05-03T14:04:30+5:302023-05-03T14:04:46+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सहाय्य
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : कर्करोग, ह्दयरोग, किडनी विकार या दुर्धर आजार झाल्यास रुग्णांसोबत त्याच्या कुटुंबियांना याची झळ बसते. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडून १४ लाख रुपयांची देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली. मागील आर्थिक वर्षात सुमारे ९३ रुग्णांना जवळपास चौदा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेसाठी राखून ठेवण्यात आलेला सर्व निधी खर्ची करण्यात प्रशासनाला यश आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे.
कर्करोग, किडनी विकार व हृदयरोग या तीन दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना जिल्हा परिषद मार्फत आर्थिक मदत देण्यात येते. २०२२-२३ या वर्षासाठी सेस फंडातून १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा सर्व निधी पात्र रुग्णांना देण्यात प्रशासनाला यश आले आहे.
९३ रुग्णांना मदतीचा हात
जिल्ह्यातून एकूण १५८ रुग्णांनी दुर्धर आजारग्रस्तांनी मदतीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ९३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर ६५ रुग्ण अपात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या ९३ रुग्णांना प्रत्येकी एका रुग्णाला १५ हजार रुपयांची मदत जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.