कुणी भजन गायलं,कुणी कोरडा रंग उधळला कुणी तिरडी काढली..म्हणाले आज होली है...
By काशिनाथ वाघमारे | Published: March 12, 2023 06:35 PM2023-03-12T18:35:14+5:302023-03-12T18:35:36+5:30
संस्कृतीप्रिय, उत्सवप्रिय शहरात कोरोनातील दोन वर्षानंतर यंदा मुक्त वातावरणात रंग खेळला गेला.
सोलापूर : संस्कृतीप्रिय, उत्सवप्रिय शहरात कोरोनातील दोन वर्षानंतर यंदा मुक्त वातावरणात रंग खेळला गेला. काही व्यापा-यांच्या सोसायट्यांमध्ये भजन गात लहान मुलाची पहिली रंगपंचमी साजरी केली. याबरोबरच काही ठिकाणी काेरडार रंग खेळत शांतताप्रियता दाखवली. गजबजलेल्या भवानी पेठेत काही तरुणांनी गलका करीत चक्क तिरडी काढून रंग उधळला. काही ठिकाणी नियमतीपणे ओला रंग लावूला तर काही चौकात काही तरुणांनी अंडी फेकून रंगोत्सव साजरा केला.
राजस्थानी बांधवांचा 'धुंड'
राजस्थानी समाजात जन्मून एक वर्ष झालेल्या लहान मुलांची पहिली रंगपंचमी ही 'धुंड' या अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धती रूढ आहे. एक वर्षाच्या मुलाला नवीन पांढरे कपडे घालून त्याच्या गळ्यात साखरेचा हार घालून ओवाळत कोरडा रंग लावून डपली वाजवून भजन गातात. सम्राट चौकात भगवती सोसायटीत भाजपचे शहर अध्यक्ष अनुप खंडेलवाल यांचा मुलगा मयंक यास नवीन कपडे घालून रंग लावत भजन गायले. त्याच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव केला. खेलो, खेलो रे होली के रंग मे खेले..अशी गाणी सादर केली.
मजुर, कामगारांना भेटवस्तू देत लावला रंग
लष्कर परिसरात मंडप डेकोरेटर कामगार, बांधकाम मजुर, रंगकाम करणारे कामगार यांना दरवर्षीप्रमाणे भेट वस्तू देऊन मालकाकडून रंग लावला जातो. त्यांना अल्पोपहार देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याची पद्धत आहे. जय जगदंबा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी त्या मजुरांना रंग लावत आनंद व्यक्त केला. अध्यक्ष विशाल हुललंतीवाले यांनी सोलापुरात १०० हून अधिक वर्षाची परंपरा असल्याचे म्हणाले.
चार तास चालल्या पाच किलोमीटर रंग गाड्या
दरवर्षीप्रमाणे सोलापूर शहरात लोधी समाजाच्या वतीने रंग गाड्यांची मिरवूणक काढून शहर वासियांवर रंगाची उधळण केली. या बैलगाड्यांमध्ये रंग पाण्यांनी भरलेल्या टिपेतून पिचका-या फवारत येणा-या जाणा-यांवर रंग उधळला. कोणी रागावला तर त्याला होली है भाई म्हणत त्याच्या चेह-यावर हसू फुलवण्याची प्रथा यंदाही जपली. बेडर पूल परिसरात बालाजी मंदिरात भगवान बालाजीला सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्या हस्ते रंगाचा टिळा लावून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली.बेडी पूल, भाजी मंडई, सतनाम चौक, कुंभार गल्ली, मौलाली चौक, जगदंबा चौक मार्गे दुपारी ३ वाजता १२२ रंगगाड्या निघाल्या. पाच किलो मीटरचा परिसर कव्हर करीत चार तासात येणा-या जाणा-यांवर रंग उधळला.
भवानी पेठेत तिरडी काढली
भवानी पेठेत तरुणांनी चक्क तिरडी काढून गेली माझी सक्की बायको गेली...म्हणत पाठीमागून रंग उधळत हशा पिकवला. ढोर गल्ली आणि बलीदान चौकातील या तरुणांनी अशा अनोख्या पद्धतीने रंगोत्सव करीत सोलापूरकरांचे लक्ष वेधले.