दुधाचा कॅन उघडताच सुटला दारूचा घमघमाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:18+5:302021-08-28T04:26:18+5:30
दत्तात्रय विश्वनाथ पाटील (रा. वाघोली, वय ३६) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो दररोज सोलापूरला ये-जा करीत होता. ...
दत्तात्रय विश्वनाथ पाटील (रा. वाघोली, वय ३६) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो दररोज सोलापूरला ये-जा करीत होता.
पोलीस सूत्रांनुसार दत्तायत्र पाटील हा (एम.एच.१३, डी.के. २१९९) या मोटारसायकलला दुधाचे कॅन अडकवून देशी व विदेशी दारू बेकायदेशीररीत्या आणि विना परवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती हवालदार जीवराज कासवीद यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना ती संशयित गाडी थांबवून चौकशी केली. दुधाचे कॅन उघडून पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या एकूण ५५ बाटल्या आढळून आल्या.
याबाबत पाेलीस श्रीकांत देवकते यांनी फिर्याद दाखल केली आहे. दारू, कॅन, मोटारसायकल असा एकूण २४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जीवराज कासवीद अधिक तपास करीत आहेत.
----
अन् अलगद जाळ्यात अडकला
संबंधीत दूधवाला वाघोली येथून शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते सोलापूर येथे विक्रीसाठी रोज जात होता. गुरुवारी त्याने येताना सोलापूर येथून देशी-विदेशी दारूचे खंबे विकत घेतले आणि चक्क दुधाच्या रिकाम्या कॅनमध्ये ठेवले आणि वाघोलीकडे येत होता. ही माहिती पोलिसांना मिळाली अन् दुधाचा व्यवसाय करणारा तो चक्क दारूच्या बाटल्यांसह अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
----