धक्कादायक; सोलापुरातील तरुण पिढी घरच्यांना न सांगता जातेय बँकॉक-पटायाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 12:44 PM2021-02-09T12:44:11+5:302021-02-09T12:44:18+5:30
मध्यमवर्गीय सोलापूरकरांचे प्रमाण अधिक : इतर देशाच्या तुलनेने कमी पैशांत होते परदेशवारी
सोलापूर : सध्या परदेशांमध्ये जाणाऱ्या सोलापूरकरांची संख्या वाढत आहे. दुबई, सिंगापूर, अमेरिका, मालदीव, मलेशिया, युरोप यांसारख्या देशांमध्ये जाण्यास पर्यटक पसंती देत असले तरी २० टक्के लोक हे बँकॉक-पटायाला जात असतात. डान्स बार बंद झाल्यानंतर बँकॉक-पटायाला जाण्याची क्रेझ सोलापुरात वाढत आहे, असे निरीक्षण पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी नोंदविले.
टूरचे आमिष दाखवून पन्नास लोकांना ६० लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना घडल्यानंतर या टूरसाठी लोक नेमके किती आणि कशासाठी जातात, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ टीमने पाहणी केली. त्यावरून उपरोक्त माहिती हाती आली.
परदेशांमध्ये जाण्याची इच्छा तर अनेक पर्यटकांना असते. त्यात तरुण पिढी ही बँकॉक-पटायाला जाण्यास जास्त पसंती देते. कमीत कमी ४० हजारांमध्ये एक व्यक्ती बँकॉक-पटाया फिरून येऊ शकते. बँकॉक-पटायाला असलेले नैसर्गिक सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करीत असते. त्यातच तरुण पिढीला तिथे दिल्या जाणाऱ्या थाई मसाजचे जास्त आकषर्ण आहे. या मसाजसोबतच अनेक मनोरंजक स्थाने तिथे आहेत.
भारताच्या तुलनेने थायलंडमधील संस्कृती वेगळी आहे. तिथे अतिशय खुले वातावरण असल्यामुळे त्याचा अनुभव घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. हे आकर्षणाचे केंद्र आहे; शिवाय तिथे फसवणुकीचीही शक्यता जास्त असते. ज्याला परदेशी फिरण्याचा कमी अनुभव आहे, अशी व्यक्ती सहजरीत्या यात फसू शकते. अनेक खासगी कंपन्यांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाचे लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण केल्यास बँकॉक-पटायाला जाण्याची संधी दिली जाते.
सोलापूरातून बँकॉक-पटायाला जाण्यासाठी आधी मुंबईला जावे लागते. मुंबईतून विमानाची सोय असते. कमीत कमी ४० हजारांमध्ये बँकॉक-पटाया चार दिवसांत फिरता येणे शक्य आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी थायलंड देशाने व्हिसा तिथे गेल्यानंतरही काढण्याची सोय केली आहे. यामुळे कमीत कमी कागदपत्रांत या देशांत जाता येते. सुंदर बिचेस, मसाजसारख्या आकर्षित करणाऱ्या सुविधेसोबतच कॅसिनो, डिस्को, पबसारखे मनोरंजनात्मक खेळही तिथे आहेत.
१८ ते ३५ वयोगटातील बॅचलर मुलांची पसंती
सोलापूर शहरातील कुटुंबात सातच्या आत घरात अशा संस्कृतीत मुले वाढतात. तिथेसुद्धा आजकाल ही तरुण पिढी घरच्यांना न सांगता बँकॉक-पटायाला जात आहेत. यात बॅचलर (अविवाहित) असणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण मुलांची पसंती ही बँकॉक-पटाया असते. येथे जाण्यासाठी प्रसंगी कर्ज काढणाऱ्यांची संख्या बरीच आहे. त्यातही फक्त एकदाच नव्हे तर वर्षातून दोनदा जाण्याचा कलही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. विशेष म्हणजे एचआयव्ही बाधित तरूणांची संख्याही या पर्यटकांमध्ये अधिक आहे.
आपल्या देशातील संस्कृती व थायलंडमधील संस्कृती यांत बरेचसे अंतर आहे. त्यामुळे तिथली संस्कृती पाहण्यासाठी अनेक लोक जातात. तिथे नैसर्गिक सौॆंदर्यासोबत डिस्को, कॅसिनोसारखे मनोरंजनात्मक खेळ असतात. परदेशात जाणाऱ्यांमध्ये १० टक्के पर्यटक हे बँकॉक-पटायाला जातात.
- बसवराज मसुती, व्यवस्थापक, ट्रॅव्हल्स एजन्सी, सोलापूर