पोटनिवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादीची मुंबईत खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:36+5:302021-03-18T04:21:36+5:30
मंगळवारी मुंबईमध्ये पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी निवडीवरून झालेले मतभेद त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ...
मंगळवारी मुंबईमध्ये पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी निवडीवरून झालेले मतभेद त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडी, सध्या मतदारसंघातील नागरिक, मतदारांच्या मनातील कल, भविष्यात घ्यावे लागणारे निर्णय याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यावर येत्या काही दिवसांत मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्ष आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगण्यात आले असले तरी आ. भालके यांचे पुत्र भगिरथ भालके हे निवडणुकीत आपणच उमेदवार, असे गृहीत धरून कामाला लागले आहेत.
महाविकास आघाडीतीलच घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने या जागेवर दावा ठोकत असताना आमचा विचार व्हावा, अशी मागणी आघाडीतील प्रमुख नेत्यांकडे केली आहे. त्यानंतर निवडणूक जाहीर होताच शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष या महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळत नसेल तर भाजपा किंवा इतर पक्षांतूनही लढण्याची चाचपणी करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बुधवारी दिवसभर याविषयी नवीन चर्चा मतदारसंघात रंगत होत्या. महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमार्फत मतदारसंघात गाठीभेटी घेत उमेदवारी नक्की कोणाला द्यावी, निवडून कोण येईल, समोरचा उमेदवार कोण असेल याविषयी माहिती घेत समीकरणे जुळविली जात आहेत. या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या आठवड्यात पंढरपूरला येत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होताना दिसत आहेत. धनगर समाजानेही होळकरवाड्यात बैठक घेत आमच्या समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यास वेगळा विचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. महादेव जानकर रासपकडून गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होताच खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.
परिचारकांची भूमिका अद्यापही अस्पष्ट
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र बैठक घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांच्या गटातील कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही. त्यांच्या कुटुंबातून उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांची नावे कार्यकर्ते पुढे करत असले तरी तेच नगराध्यक्षा असलेल्या साधना भोसले यांचे नाव पुढे करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिचारक नक्की कोणती भूमिका घेणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
येत्या दोन दिवसांत बैठकांचे सत्र
पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरही अनेक प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार कोण हे जाहीर न करता सस्पेन्स ठेवला आहे. पंढरपुरात अनेक पक्षांत दोन-तीन गट आहेत. पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यापूर्वी या सर्व गटांनी एकत्र बसून त्यांच्यामध्ये समन्वय साधत उमेदवारांची नावे घोषित करावी लागणार आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत पंढरपुरात प्रमुख पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. त्यानंतरच उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.