हरवलेल्या नाती परत मिळताच आजोबा गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:55+5:302020-12-05T04:48:55+5:30
कुसळंब : बोलता येत नाही...समोरच्या व्यक्तीची भाषाही समजत नाही...अशा स्थितीत रस्ता भरकटलेल्या दोन मूकबधिर मुलींना कुटुंबापर्यंत पोहोचवणे अवघड होते...पोलिसांनी ...
कुसळंब : बोलता येत नाही...समोरच्या व्यक्तीची भाषाही समजत नाही...अशा स्थितीत रस्ता भरकटलेल्या दोन मूकबधिर मुलींना कुटुंबापर्यंत पोहोचवणे अवघड होते...पोलिसांनी त्यांचे फोटो आणि माहिती जवळच्या गावातील पोलीस पाटलापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवले..आजोबाला पाहताच गहिवरुन येत कवठाळून त्या दोघींनी अश्रूला वाट करून दिली.
ही कहाणी आहे मालन सुरेश शिंदे (वय १२ वर्षे) व संगीता सुरेश शिंदे (वय १० वर्षे) या दोन मूकबधिर मुलींची.
दोन लहान मुली वालवड येथे फिरताना ग्रामस्थांना आढळून आल्या. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना बोलता येत नव्हते. ग्रामसुरक्षा दल व वालवडच्या पोलीस पाटील मृणालिनी भालेराव व सुहास भालेराव यांनी त्या दोघींना घेऊन पांगरी पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी त्या मुलींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी त्या दोन मुलींचे फोटो व त्यांची माहिती भोवतालच्या गावातील पोलीस पाटील व इतर व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरवली. पाथरी (ता. बार्शी)चे पोलीस पाटील शंकर गायकवाड यांच्याकडून प्रतिसाद मिळाला.
या मुली पाथरी येथे मागील चार वर्षांपासून दगडफोडीचे काम करणारे माणिक शिंदे (रा. नाथापूर, ता. जि. बीड) यांच्या नाती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तत्काळ पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून घरी नव्हत्या. दरम्यान, आजोबांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही आढळत नव्हत्या.
या दोन नातींना शोधून त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस काॅन्स्टेबल अर्जुन कापसे, फिरोज तडवी, सुनील बोदमवाड, बबिता उर्वते यांनी प्रयत्न केले.
---
फोटो : ०४ कुसळंब
हरवलेल्या नाती परत मिळाल्यानंतर आजोबांकडे सोपवताना सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल आणि पोलीस कर्मचारी.