फोन करताच विद्यार्थिनींच्या मदतीला पोलिसांची गाडी हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 04:44 PM2020-01-06T16:44:47+5:302020-01-06T16:49:02+5:30

विद्यार्थिनींना सुरक्षित घरी पोहोचविले। पंढरपुरातील निर्भया पथकाची कामगिरी

As soon as the phone calls, a police car is available to assist the students | फोन करताच विद्यार्थिनींच्या मदतीला पोलिसांची गाडी हजर

फोन करताच विद्यार्थिनींच्या मदतीला पोलिसांची गाडी हजर

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलाच्या सुरक्षिततेसाठी शहरात निर्भया पथक व चार्ली नंबर ५ कार्यरत महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना सुरु केली त्या दोन विद्यार्थिनींच्या धाडसाबाबत पो.नि. दयानंद गावडे यांनी कौतुक केले

पंढरपूर : मला उशीर झाला आहे. घरचा फोन लागत नाही. अशी माहिती तरुणीकडून मिळताच तत्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गाडीतून संबंधित तरुणीला तिच्या घरी सुरक्षित पोहोच करण्यात आले.

महिलाच्या सुरक्षिततेसाठी शहरात निर्भया पथक व चार्ली नंबर ५ कार्यरत आहे. निर्भया पथकातील महिला कर्मचारी प्रत्येक शाळा व कॉलेज याठिकाणी विद्यार्थिनीचे छेडछाडीचे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्याचे काम करते. तर चार्ली नंबर पाच ही सार्वजनिक ठिकाणी महिलांची व तरुणींची छेडछाड न होण्याच्या दृष्टीने काम करत आहे.  

त्याचबरोबर हैदराबाद येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना सुरु केली आहे. यामध्ये कोणत्याही वेळी अल्पवयीन, विद्यार्थिनी, तरुण व वृद्ध महिला अडचणीत सापडली असल्यास किंवा त्यांना घरी जाताना सुरक्षित न वाटल्यास, संशयित वाटल्यास त्यांना पोलीस गाडीमध्ये नेऊन सोडण्याची सोय उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भयापथक प्रमुख राजेंद्र गाडेकर, पो.कॉ. कुसुम क्षीरसागर, पो.कॉ. विलास आलदर, पो.कॉ. विनोद शिंदे, पो.ह. अविनाश रोडगे, विजय देढे हे करत आहेत.

कासेगाव येथे राहतो, आम्हाला घरी जायचे आहे, परंतु भीती वाटतेय असा फोन दोन विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना केला. तत्काळ त्यांनी त्या विद्यार्थिनींना मदत पोहोचवली तसेच त्यांना इतर काही त्रास आहे का याबाबत चौकशी केली. यावर त्या तरुणींनी वडिलांचा फोन बंद लागतोय. यामुळे तुम्हाला फोन केला. असे सांगितले. यानंतर त्या दोन विद्यार्थिनींच्या धाडसाबाबत पो.नि. दयानंद गावडे यांनी कौतुक केले. 

व निर्भया पथकातील पो.कॉ. कुसुम क्षीरसागर, पो.कॉ. विनोद शिंदे, वाहन चालक पो.ह. अविनाश रोडगे व पो.कॉ. सोनाली इंगोले, पो.कॉ. आरती घुमरे यांना त्या विद्यार्थिनींना घरी पोहोचवण्यास पाठवले. त्या तरुणींना घरी आणल्यानंतर वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

‘प्रतिसाद’ मोबाईल अ‍ॅप कार्यरत
महिलांच्या तक्रारीविषयी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन (१०९१) कार्यरत आहे. या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करुन मदत घेता येईल. व्हॉट्सअ‍ॅपवरही तक्रार करता येईल. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कल्पनेतून सामान्य जनता, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासाठी ‘प्रतिसाद’ हे एकच मोबाईल अ‍ॅप कार्यरत आहे. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये अ‍ॅप घेऊन नंबर रजिस्टर करा. अ‍ॅपमध्ये आवश्यक ती माहिती भरा. त्यानंतर पोलीस मदतीसाठी त्यामधील लाल रंगाच्या आयकॉनवर क्लिक केल्यास जवळच्या पोलीस ठाण्याकडून तत्काळ मदत मिळणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितली.

शहरातील विद्यार्थिनी, तरुणी व महिलांची कोण छेडछाड काढू नये यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करुन रोडरोमिओंना धडा शिकवण्यात येत आहे. तसेच महिलांना त्रास देणाºयांची गय केली जाणार नाही.
- दयानंद गावडे
पोलीस निरीक्षक, पंढरपूर

रात्री ९ ते पहाटे ५ वाजण्याच्या या वेळेत महिला अडचणीत असेल, कामावरुन किंवा अन्य ठिकाणावरुन तिला तिच्या घरी किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यास असुरक्षितता वाटत असेल तर त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे क्रमांक ०२१८६-२२३४४३ व निर्भया पथकाच्या ८९९९९३८०८० या नंबरशी संपर्क साधावा. 
- कुसुम क्षीरसागर
महिला पोलीस, निर्भया पथक

Web Title: As soon as the phone calls, a police car is available to assist the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.