पोलीस येताच वऱ्हाडींनी तरुणीला उभे केले; ते जाताच अल्पवयीन मुलीचे लग्न उरकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:58 AM2021-05-26T11:58:04+5:302021-05-26T11:58:09+5:30
बालविवाह सोहळा : वर-वधू पित्याने लढवली शक्कल
सोलापूर : जुळे सोलापूर येथील कल्याणनगर भाग-३ मध्ये सुरू असलेल्या विवाह सोहळ्यादरम्यान पोलिसांना पाहताच नातेवाइकांनी अल्पवयीन ऐवजी मोठ्या मुलीला मंडपात उभे केले. मुलगी मोठी असल्याचे पाहून पोलीस निघून गेले. त्यानंतर मात्र पुन्हा नियोजित अल्पवयीन मुलीबरोबर विवाह सोहळा पार पडल्याचा प्रकार सोमवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडला.
कल्याणनगर भाग-३ येथील घराच्या समोर लग्नाचा मंडप टाकण्यात आला होता. मात्र, लग्न अवघ्या १५ ते १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत होत होते. याची माहिती एका खबऱ्याने विजापूर नाका पोलिसांना दिली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस कल्याणनगरात दाखल झाले. पोलिसांना पाहताच नातेवाइकांनी तत्काळ शक्कल लढवली. ज्या अल्पवयीन मुलीचा विवाह होता, तिच्या मोठ्या बहिणीला नावरीचे कपडे घालून बसवले. पोलिसांनी विचारणा केली असता नवरीच्या मोठ्या बहिणीला समोर आणण्यात आले. पोलिसांनी मुलीचे आधारकार्ड, त्यावरील जन्मतारीख आणि वय यांची खात्री केली. मुलगी मोठी असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस मिळालेली माहिती खोटी असल्याचा समज करून निघून गेले. पोलीस कल्याणनगर येथून बाहेर पडले. थोडावेळ विवाह सोहळा थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा लगेच नातेवाइकांनी नियोजित अल्पवयीन मुलीला लग्नाच्या मंडपात आणले आणि विवाह सोहळा उरकून घेतला.
कल्याणनगर परिसरात चर्चेचा विषय
0 कल्याणनगर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. वास्तविक पाहता ज्या मुलीला पोलिसांसमोर दाखवण्यात आले होते, ती त्या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण होती. तिचा साखरपुडा झाला असून, तिचाही विवाह होणार आहे. मात्र लहान अल्पवयीन मुलीचा अगोदर करण्यात आला. या प्रकार कल्याणनगर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
लग्न सोहळ्यासाठी परवानगी नव्हती
लग्नाच्या कार्यक्रमासाठी सध्या कोरोनामुळे परवानगी घेणे आवश्यक आहे. नातेवाइकांनी तशी परवानगीही घेतली नव्हती. पोलीस जेव्हा कल्याणनगरामध्ये आले तेव्हा त्या ठिकाणी विनामास्क असलेल्या नातेवाइकांवर दंडात्मक कारवाई केल्याचेही समजते.
कल्याणनगर भाग-३ मधील अल्पवयीन मुलीच्या विवाहासंदर्भात चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधितांवर बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल होईल.
-उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक, विजापूर नाका पोलीस ठाणे