पोलिसांनी अडवताच टेंभुर्णीत रणजितसिंहांचा अर्धातास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:02+5:302021-07-05T04:15:02+5:30
टेंभुर्णी : मराठा आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापूरकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात तालुक्याच्या सीमेवर नाकाबंदी केली. आमदार ...
टेंभुर्णी : मराठा आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापूरकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात तालुक्याच्या सीमेवर नाकाबंदी केली. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी १० वाजता भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते टेंभुर्णी येथून जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. येथेच रणजितसिंहांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने केलेल्या प्रबोधनानंतर प्रोटोकॉल पाळत कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने सोलापूरकडे रवाना झाले.
मराठा आक्रोश मोर्चासाठी परवानगी नाकारल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी करूनच वाहने सोलापूरकडे सोडली. टेंभुर्णी येथेही सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर नाकाबंदी केली. सकाळी १० च्या सुमारास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटीलसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या १५ गाड्यांचा ताफा येथील महामार्गावरील संभाजी चौकात दाखल झाला. तेव्हा नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे वाहनांची तपासणी चालू केली. तेव्हा ताफ्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कृतीचा निषेध करत महामार्गावरच ठिय्या आंदोलन करून महामार्ग रोखून धरला.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सचिव धैर्यशील मोहिते- पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भाजपा माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, युवा मोर्चाचे सुभाष इंदलकर, निवृत्ती तांबे, संदीप घाडगे यांच्यासह दोन- तीनशे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीबाबत पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे प्रबोधन केले आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने सोलापूरकडे रवाना झाले.
-----
०४ टेंभुर्णी
पोलिसांनी अडवताच रणजितसिंह मोहिते- पाटील आणि कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी येथे ठिय्या मारला.
040721\img-20210704-wa0026.jpg
टेभुर्णी येथे महामार्गावर मराठा आक्रोश मोर्चास निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन