राजेंद्र राऊतांनी इशारा देताच पोलिसांनी कार्यकर्त्यांची वाहने सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:15+5:302021-07-05T04:15:15+5:30
बार्शी तालुक्यातून २२५ वाहनांतून गेले होते कार्यकर्ते लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : मराठा आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापूरकडे ...
बार्शी तालुक्यातून २२५ वाहनांतून गेले होते कार्यकर्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : मराठा आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापूरकडे निघालेल्या बार्शीतील कार्यकर्त्यांची वाहने पोलिसांनी अडवली. काही ठिकाणी काही काळ अडवूनही ठेवली. मात्र बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा संपर्क करून देताच पोलिसांनी नारमाईची भूमिका घेत अडवलेली वाहने सोडली.
मराठा आरक्षण आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने सोलापूर-बार्शी, सोलापूर-तुळजापूर, बार्शी-कासारवाडी रोड व बार्शी-कुर्डूवाडी रोड या मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी कडक केली होती. सोलापूरकडे निघालेल्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या गाडीलाही अडवले होते. मात्र त्यांना लगेच सोडले, पण गावोगावहून आलेल्या कार्यकर्ते यांना सोडले नाही. आमदारांनी सोलापुरात इशारा दिल्यावर हे कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले.
सोलापूरकडे निघालेल्या बार्शीतील ॲड. राजश्री डमरे-तलवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे, सुरेश घोडके, शंतनू पवार, दादासाहेब गायकवाड, शंकर जाधव, नितीन आवटे, सुमंत मोरे, मनोज मोरे, अमोल मोरे, शंकर गरड, आप्पासाहेब पवार यांना बार्शी पोलिसांनी अडवले. त्यांनी आमदार राऊत यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी वाहन क्रमांक आणि नावे लिहून घेऊन सोडले. मात्र सोलापूर हद्दीवर त्यांना पुन्हा अडवले. केगाव येथे त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. मोर्चा संपल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.
----
प्रत्येक गावासाठी एक वाहन
मराठा आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांसाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी वाहनांची सोय केली होती. प्रत्येक गावासाठी एक तर शहरात ३० वाहनांची सोय केली होती. काही कार्यकर्ते स्वतःची वाहने घेऊन आले होते. तालुक्यातून २२५ वाहनांतून मोर्चेकरी सोलापूरला गेले.