सहा जणांनी अर्ज माघार घेताच वडवळ ग्रामपंचायत झाली बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:30+5:302021-01-08T05:11:30+5:30
१९५६ साली स्थापन झालेली वडवळ ग्रामपंचायत यापूर्वी फक्त एकदा २००५ साली बिनविरोध झाली होती. या वर्षी तीर्थक्षेत्र वडवळचा सर्वांगीण ...
१९५६ साली स्थापन झालेली वडवळ ग्रामपंचायत यापूर्वी फक्त एकदा २००५ साली बिनविरोध झाली होती. या वर्षी तीर्थक्षेत्र वडवळचा सर्वांगीण विकास करायचा या विचाराने गावातील विविध पक्षांच्या तरुणांनी एकत्र येत बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला योग्य प्रतिसाद देत ९ जागांसाठी ९ अर्ज एकत्रित भरण्यात आले होते. त्यानंतर ६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या ६ उमेदवारांची गावातील सर्व तरुणांनी समजूत काढून महत्त्व पटवून दिल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला व बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
श्रीकांत शिवपुजे, साधना देशमुख, धनाजी चव्हाण, राहुल मोरे, स्वाती मळगे, नंदा नरळे, जालिंदर बनसोडे, माधुरी मोरे, रूपाली पवार यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माजी सरपंच पोपटबाई मळगे, रमेश पोतदार, संताजी मोरे, दीपक काकडे, प्रीती माने, सुधाकर बनसोडे यांनी माघार घेतली.
पती-पत्नीची बिनविरोध निवड
वडवळ ग्रामपंचायतीसाठी प्रभाग २ मधून माजी सरपंच राहुल मोरे व प्रभाग ३ मधून त्यांच्या पत्नी माधुरी मोरे या दोघांनीही अर्ज दाखल केले होते. या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे.
फोटो
०४वडवळ०१
वडवळ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर गावातील तरुणांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.