सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, बाजरीचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:40 AM2018-11-23T10:40:04+5:302018-11-23T10:42:09+5:30
पावसाने निराशा : दुर्री जातीची हायब्रीड ज्वारी खावी लागणार
करमाळा : सरलेल्या मान्सूनमध्ये पावसाने घोर निराशा केल्याने खरीप हंगामात बाजरीचे पीक वाया गेले तर रब्बी हंगामात ज्वारीची पेर झाली नाही. याचा परिणाम बाजारात बाजरी व ज्वारीचे भाव कडाडले असून, बाजरी प्रतिक्विंटल १७०० ते १९०० रुपये तर ज्वारी प्रतिक्विंटल ३१०० ते ३६०० रुपये भावाने मिळू लागली आहे. दुष्काळामुळे आपल्या भागातून बाजरी व ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटल्याने कर्नाटक,आंध्र या शेजारच्या राज्याबरोबर मराठवाडा, विदर्भातून आयात होणारी दुर्री जातीची हायब्रीड ज्वारी आपल्याला यंदा खावी लागणार आहे.
करमाळा तालुक्यात उजनी धरणामुळे अलीकडील काळात ऊस व फळबागाचे क्षेत्र वाढलेले असले तरी मूळ ज्वारीचे कोठार म्हणून करमाळ्याची ओळख अद्यापही टिकू न आहे; मात्र यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे बाजरीसह ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. यामुळे प्राचीन परंपरा लाभलेल्या ज्वारीच्या कोठाराला आता शेजारच्या कर्नाटक,मराठवाडा व विदर्भातून आयात करण्याची वेळ आली आहे. बाजरी खानदेशातून आयात करावी लागत आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगाम घेताच आलेला नाही. खरीप हंगामात येथील शेतकºयांनी ४४४ हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेर केली पण पावसामुळे पीक हाती लागले नाही. गतवर्षी ४९८ हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली होती. हेक्टरी पाच क्विंटल प्रमाणे २४९० क्विंटल बाजरीचे उत्पादन घेण्यात आले. यंदा ५०० क्विंटलसुध्दा बाजरी पदरात पडलेली नाही. गत हंगामात १९ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती हेक्टरी सहा क्विंटलप्रमाणे १ लाख १७ हजार १८० क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले. मागील तीन वर्षांत पाऊसमान विचारात घेता ज्वारीचे उत्पादन बºयापैकी झाले होते, पण यंदा दुुष्काळामुळे ज्वारी उत्पादनात प्रचंड घट आली आहे.
ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट
- यंदाच्या रब्बी हंगामात उशिराने अवघ्या १०६ हेक्टर क्षेत्रात ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या आहेत. वेळेवर पाऊस पडला नसल्याने ज्वारीची वाढ खुंटलेली असून उत्पादनात कमालीची घट येणार आहे. त्यामुळे बाजारात दुर्री जातीच्या हायब्रीड ज्वारीची आयात होऊ लागली आहे.