रखरखत्या उन्हात ज्वारी काढणीला वेग, मजुरी वाढली... गड्याला दिवसा ६०० रुपये
By विठ्ठल खेळगी | Published: March 5, 2023 07:16 PM2023-03-05T19:16:01+5:302023-03-05T19:16:46+5:30
ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे.
विठ्ठल खेळगी, सोलापूर/करमाळा : ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे. भरउन्हात ज्वारी काढणीला उत्साह यावा म्हणून ‘भलं रं भलं गडी दादा भल’चे सूर उमटू लागले आहेत. उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या ज्वारी काढणीस सुरुवात झाली आहे. गड्याला एका दिवसाला ६०० रुपये मजुरी देण्यात येत आहे.
सध्या तालुक्यातील कुंभारगाव, सावडी, कोर्टी, मोरवड, वीट, देवळाली, झरे, लव्हे, निंभोरे, साडे, सालसे, केम, वडशिवणे परिसरात ज्वारी काढणीस चांगलाच वेग आला आहे. जिरायती भागात सुगी चालू झाल्याने मजुरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मजुरांना वाढीव मजुरी देऊन ज्वारीची काढणी शेतकरी करत आहेत. पुरुष मजुराला ६०० रुपये हजेरी तर महिलांना ३०० रुपये हजेरी द्यावे लागत आहे. वाढलेल्या मजुरीमुळे काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य ज्वारीची काढणी करत आहेत.
मळणीच्या कामांना गती
काढणी केलेल्या ज्वारीची मशीनच्या साहाय्याने मळणीची कामेही सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी प्रमाणात ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, ज्वारी काढून त्याची लवकर मळणी करून त्याची विक्री करण्याच्या मार्गावर शेतकरी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"