दक्षिण विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्र्यांना शह कोण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:37 PM2019-07-03T19:37:22+5:302019-07-03T19:43:47+5:30
शेळके, शिवदारे, हसापुरे यांची भूमिका महत्त्वाची; ‘वंचित’चा शोध तर शिवसेनेची नुसतीच धडपड
राजकुमार सारोळे
सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची छुपी तयारी जोरात आहे. बहुजन वंचित आघाडीने उमेदवाराचा शोध सुरू केला असून, युतीवर भाजप-सेनेचे गणित सुरू आहे.
काँग्रेसचे माजी आमदार कै. आनंदराव देवकते यांच्या काळात दक्षिण सोलापूर विधानसभा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर सेनेचे रतिकांत पाटील यांच्या माध्यमातून हा किल्ला भेदला गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सन २००४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर या मतदारसंघातून पुन्हा बिनविरोध निवडून आले. त्यानंतर काँग्रेसचेच दिलीप माने यांनी ही सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. त्यानंतर मात्र भाजपचे सुभाष देशमुख यांनी हा गड ताब्यात घेतला. सलग दोनवेळा त्यांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले आहे. सध्या देशमुख यांच्याकडे सहकार मंत्रिपद असल्याने त्यांच्या विरोधात कोण, अशी फक्त चर्चाच तालुक्यात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तालुक्यातील राजकीय स्थित्यंतरे पाहिली तर विधानसभेसाठी इच्छुकांची छुपी तयारी दिसून येत आहे. भाजप-सेना युती होणार का, यावरही काही जणांची गणिते सुरू आहेत. माजी आमदार दिलीप माने यांनी अद्याप काँग्रेसकडे उमेदवारी अर्जाची मागणी केलेली नाही. लोकसभा व बाजार समितीच्या सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार, याबाबतही वेगवेगळी चर्चा सुरू आहे. सेनेतर्फे गणेश वानकर, अमर पाटील ही नावे चर्चेत आहेत.
मोहिते-पाटील गट भाजपमध्ये गेल्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. बाजार समिती सभापती निवडणुकीवेळेस नाराज बाळासाहेब शेळके यांनी काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज मागितलेला नाही. तसेच सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांची कोणाबरोबर फारकत होणार, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मध्येच दुष्काळी दौरा केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बहुजन वंचित आघाडीनेही तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपचे एकीकरण सुरू...
- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जवळीक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिण सोलापूर मतदार संघाचा बराचसा भाग सोलापूर शहरात येतो. त्यामुळे हद्दवाढ भागातील विकासकामावर त्यांनी भर दिला आहे. मतदार संघातील मंद्रुप व इतर मोठया गावांमध्ये संपर्कावर भर दिला आहे. दिलीप माने यांनी मतदार संघातील नेत्यांच्या हालचालीचा कानोसा घेत सध्यातरी शांत राहणे पसंत केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आक्रमक झालेले शेळके यांनीही पाहू अजून वेळ आहे अशी भूमिका घेतली आहे.
नाराजांची मोट बांधणे सर्वांनाच अवघड
- दक्षिण सोलापुरात सर्वच पक्षांच्या पदाधिकाºयांना नाराजांची मोट बांधण्याचे आव्हान आहे. यात खुद्द सहकार मंत्रीही अपवाद नाहीत. भाजपच्या बैठकीला तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी दांडी मारली. लोकसभा व बाजार समिती सभापती निवडणुकीमुळे काँग्रेसच्या गोटात प्रचंड नाराजी आहे. मोहिते-पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीतील त्यांच्या गटाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. शिवसेनेत जुन्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतली जात नसल्याची तक्रार रमेश नवले यांची आहे. अशा नाराजांना संपर्काचे काम वंचित बहुजन आघाडीने सुरू केले आहे. यात कोण कोणाच्या गळाला लागणार, यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे.