कुजलेले शेणखत अन् बेसल खताच्या डोसावर घेतले वीस लाखांचे पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:09 PM2020-02-13T12:09:08+5:302020-02-13T12:12:10+5:30

विशाखापट्टणममधून आणली रोपे : शेटफळमधील शेतकºयाचा दोन एकरावरील प्रयोग यशस्वी

Sow twenty lakhs on roasted dung and basal manure dosa | कुजलेले शेणखत अन् बेसल खताच्या डोसावर घेतले वीस लाखांचे पेरू

कुजलेले शेणखत अन् बेसल खताच्या डोसावर घेतले वीस लाखांचे पेरू

googlenewsNext
ठळक मुद्देरासायनिक बेसल खताचा डोस देऊन पाच महिन्यांत १५ टन उत्पादन घेण्याची किमया साधलीआजपर्यंत  १५ टन उत्पादन मिळाले़ दिल्ली, हैदराबाद, पुणे बाजारपेठेत या फळाला सुरुवातीला १२० ते १५० रुपये दर मिळाला

नासीर कबीर
करमाळा : मित्राच्या दुकानात बसलेल्या तरुणाला व्हीएनआर वाणाच्या पेरूची माहिती मिळाली़ विचार स्वस्थ बसवेना़ विशाखापट्टणम येथून आणलेल्या रोपांची दोन एकरावर लागवड केली़ या फळपिकाने जवळपास २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ कुजलेले शेणखत आणि रासायनिक बेसल खताचा डोस देऊन पाच महिन्यांत १५ टन उत्पादन घेण्याची किमया साधली आहे करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकºयाने़ 

विजय लबडे असे त्या पेरू उत्पादकाचे नाव आहे. २०१७ साली मित्राच्या कृषी केंद्रात गप्पा मारत असताना एका व्यक्तीने पेरूच्या व्हीएनआर या वाणाची माहिती दिली़ त्यातून त्याचे फायदे लक्षात आले़ यापूर्वी केळी, कलिंगड, कांदा या पिकांचे भरघोस उत्पादन घेतलेल्या लबडे यांनी विशाखापट्टणम येथील नर्सरीमधून आणलेल्या व्हीएनआर जातीच्या रोपांची मार्च २०१७ मध्ये स्वत:च्या दोन एकरात आठ बाय आठ फूट अंतरावर लागवड केली. तत्पूर्वी आठ ट्रेलर कुजलेले शेणखत टाकून मशागत केली़ २२ जून २०१८ रोजी छाटणी करून रासायनिक खतांचा बेसल डोस दिला़ बुरशीनाशक व कीटकनाशके यांच्या चार फवारण्या केल्या़ तसेच १३:०:४५, ०:५२:३४: ची मात्रा दिली़ अवघ्या पाच महिन्यांत फळ विक्रीसाठी तयार झाले़

आजपर्यंत  १५ टन उत्पादन मिळाले़ दिल्ली, हैदराबाद, पुणे बाजारपेठेत या फळाला सुरुवातीला १२० ते १५० रुपये दर मिळाला़ सध्या सरासरी ६० रुपये दर मिळतो आहे़ या फळाने आजपर्यंत नऊ लाख रुपयांचे उत्पन्न दिले आहे़ पेरूचे आणखी वीस टन उत्पादन निघणार आहे़ यातून त्यांना आणखी अकरा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. व्हीएनआर जातीच्या पेरूचे वजन एक ते सव्वा किलोच्यावर पोहोचले असून, या पेरूचा दिल्ली आणि हैदराबाद बाजारपेठत बोलबाला झाला आहे़ दोन एकर क्षेत्रावर वीस लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न निघत आहे. 

आंतरपिकातून घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न 
- मधल्या काळात आंतरपिकांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले. सुरुवातीला कलिंगडाची लागवड केली़ यापासून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले़ नंतर याच पेरूच्या बागेमध्ये मिरची व झेंडूचे आंतरपीक घेतले़ मिरचीपासून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ तसेच झेंडूचे पीक घेतले़ यातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़ यानंतर कांद्याचे पीक घेतले़ यात सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़ 

आपल्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन मित्र नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनीही सध्या दहा एकर क्षेत्रावर या पेरूची लागवड केली आहे़ सर्व फळाला क्रॉप कव्हर वापरून फ्रूट ट्रीटमेंट दिली आह़े  प्रत्येक फळ सहाशे ते चौदाशे ग्रॅमपर्यंत झाले आहे़ सध्या पॅकिंग बॉक्स तयार करून तिघे एकत्रित मार्के टिंग करत आहोत.
- विजय लबडे, पेरू उत्पादक, शेटफळ

Web Title: Sow twenty lakhs on roasted dung and basal manure dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.