तब्बल बाराशे हेक्टरवर खरीप मका, बाजरीची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:09+5:302021-06-17T04:16:09+5:30
सांगोला तालुक्यात यंदा रोहिणी नक्षत्राच्या (मान्सूनपूर्व ) पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी ...
सांगोला तालुक्यात यंदा रोहिणी नक्षत्राच्या (मान्सूनपूर्व ) पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून पेरणीसाठी सज्ज झाला होता; परंतु तालुका कृषी विभागाकडून तालुक्यात ९ मंडळनिहाय सरासरी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर व वापसा होताच परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन केले होते; परंतु कृषी विभागाच्या आवाहनानंतरही शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच.
आतापर्यंत झालेला पाऊस व वापसा होताच शेतकऱ्यांनी बाजरी ६२५ हेक्टर, मका ५६० हेक्टर, तूर १५ हेक्टर, उडीद ४ व सूर्यफूल ६ हेक्टर अशा एकूण १२१० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत, तर अनेक भागात शेतकरी खरीप पेरणीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्र २० जूनपर्यंत असल्याने या कालावधीत दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. या कालावधीत पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.
कोट ::::::::::::::::::::::
प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत बाजरीचे २९.२२ क्विंटल बियाणे खरेदी विक्री संघ सांगोला यांच्याकडे उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या मंडळामधील अगर तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधून बाजरी बियाणे अनुदान रकमेवर घेऊन जावे.
- रमेश भंडारे
प्रभारी तालुका कृषी अधिकारी
ट्रॅक्टरच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती
बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतकरी बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाला पसंती देऊ लागले आहेत. तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे पेरणीसाठी एकरी ८०० ते ९०० रुपये तर दोन बैलजोड्यांसाठी दिवसाला ५ हजार रुपये ३ ते ४ एकर पेरणीसाठी दर आहे. तसे पाहता शेतकऱ्याला सध्या बैलाकरवी पेरणी महाग पडत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या पेरणीलाच अधिक पसंती देत आहेत.