पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:16+5:302021-08-15T04:24:16+5:30

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. ...

Soybean growers in crisis due to lack of rains | पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

Next

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे वेळेवर आगमन झाले. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्याचे समाधान शेतकऱ्यांतून व्यक्त होत होते. पिकांची चांगली वाढ झाली. आता सोयाबीन आणि उडीद पिके फुलोऱ्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणखी चार दिवस पाऊस आला नाही तर फुलोरा गळण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाची दडी आणि दररोज पडणारे कडक ऊन या दुहेरी संकटात खरिपाची पिके सापडली आहेत. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. तर सोयाबीनची पाने कोमेजून पिवळी पडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी सोयाबीन आणि उडीद पिकाला पाणी सोडून ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिरायत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हातचे पीक जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.

-------

सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अशक्य आहे. पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर सोयाबीन आणि उडीद पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकरी १० क्विंटल उत्पादन होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन क्विंटल उत्पादन निघणे अशक्य आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा हंगाम तोट्याचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

------------

सर्वाधिक क्षेत्र बार्शीत

यंदाच्या खरीप हंगामात ४८,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या १२८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ३५,४०८ हेक्टर क्षेत्र बार्शीत, अक्कलकोट ५,२४७ हेक्टर, उत्तर सोलापूर ३,२१७ हेक्टर या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी तर माढा, मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात सोयाबीन नगण्य आहे.

------

चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप हातातून जाणार हे नक्की. आमच्याकडे वेळेवर पाऊस पडला नाही, उशिराने पेरण्या झाल्या. आता पिकांची अवस्था पाहवत नाही.

- शिवाजी कांबळे

सोयाबीन उत्पादक,

तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर

Web Title: Soybean growers in crisis due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.