सोयाबीनचे लोन माळशिरस, माढ्यापर्यंत; जिल्ह्यातील १० तालुक्यांत उन्हाळी सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 06:22 PM2022-03-25T18:22:53+5:302022-03-25T18:23:00+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा चांगलाच लळा लागला असून मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातही सोयाबीन दिसू लागले आहे. कृषी खात्याने मनावर घेऊन संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १० तालुक्यांत ७८५ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे.
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन मागील तीन-चार वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात घेतले जात आहे. सुरुवातीला बार्शी तालुक्यात सोयाबीन घेऊ लागले. त्यानंतर बार्शी तालुक्याच्या लगतच्या उत्तर तालुक्यातील गावात सोयाबीन यशस्वी झाले. त्यानंतर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातही सोयाबीन पोहोचले. खरीप हंगामात घेतले जाणारे सोयाबीन यावर्षी अवेळी व उन्हाळी हंगामातही घेतले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात काढणी झाल्यानंतर लगेच सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. याला अवेळी सोयाबीन म्हटले जाते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात पेरणी झालेले सोयाबीन आता चांगलेच बहरात आले आहे. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम फुले, कळ्यावर झाला आहे.
केवळ खरीप हंगामात घेतले जाणारे व तेही तीन-चार तालुक्यांत असलेले सोयाबीन यावर्षी उन्हाळी हंगामात १० तालुक्यांत पेरणी झाले आहे. मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा व माढा तालुक्यात फारच कमी क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली असली तरी प्रयोग म्हणून बघितले जाते.
अशी आहे पेरणीनिहाय आकडेवारी...
- माढा तालुका-१.५
- मोहोळ-२
- सांगोला-२
- माळशिरस-३
- करमाळा-३
- मंगळवेढा-६.४०
- दक्षिण सोलापूर-५९
- अक्कलकोट-९०
- उत्तर सोलापूर-३००
- बार्शी तालुका-३१८
खरीप हंगामात सोयाबीन पीक घेणे हा नियमितचा भाग आहे. मात्र यावर्षी अवेळी व उन्हाळी हंगामात सोयाबीनचा प्रयोग होत आहे. अगदी माढा- करमाळ्यातही एक-दोन प्लॅट सोयाबीन दिसत आहे. उत्पादन कमी येईल. मात्र, त्यासाठी खर्चही फारच कमी करावा लागत आहे.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी