बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग
By काशिनाथ वाघमारे | Published: November 13, 2023 04:41 PM2023-11-13T16:41:10+5:302023-11-13T16:42:08+5:30
दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.
सोलापूर : बार्शीत शिवाजी कॉलेज रोडवर हॉटेल राजवाडास रात्री अचानक भीषण आग लागल्याने दोन मजले जळून सागवानी टेबल खुर्च्या इतर फर्निचरसह ७० लाखांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना घडली. ऐन दिवाळीत उडालेल्या रॉकेटच्या ठिणग्या पडून ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
ही दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार हॉटेल मालक सुरेश बापू चोबे हे दिवसभर व्यवसाय करून रात्री बंद करून घरी गेले. लक्ष्मीपूजनानंतर या परिसरात उडवलेल्या फटाके व रॅकेटच्या पेटलेल्या ठिणग्या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर बांबूच्या गवतावर पडल्या. पाहाता-पाहाता आग भडकत गेली. त्यातच विद्युत शॉर्ट सर्किट झाला अन वा-यात भीषण आग पसरत जाऊन पूर्ण हॉटेलच पेटले.
भरलेले सहा गॅस सिलेंडर, तत्काळ बाहेर काढले...
दरम्यान या हॉटेलमध्ये गॅसने भरलेले सहा सिलेंडर कामगारांच्या मदतीने तातडीने बाहेर काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत हॉटेलमधील सागवानी ३५ टेबल , १५० खुर्च्या व ए.सी.सेट सोफे व इतर सागवानी फर्निचर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मालक बापू चोबे यांनी दिली.
दोन तासानंतर आग आटोक्यात..
आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष आसिफ तांबोळी व आ.राजेंद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलास बोलावून घेतले. याशिवाय इंद्रेश्वर साखर कारखान्याचे बंब पाचारण करण्यात आले. दोन तासांनंतर ही आग आटोक्यात आली.