शरद पवारांबद्दल बोलताना जपून बोला; चंद्रकांतदादांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:03 PM2020-11-24T13:03:50+5:302020-11-24T13:04:44+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना प्रत्येकाने जपून योग्य ते शब्द वापरले पाहिजेत, अशी भूमिका भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे मांडली.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना गुरु मानतात, तर खुप छोटे नेते आहेत असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. तुम्ही कोणत्या मताशी सहमत आहात असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, राष्ट्रवादीचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही बोलत असतात, परंतु शरद पवारांबद्दल कोणी काही बोलले तर सोयीने अर्थ काढतात. पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांबद्ल बोलताना प्रत्येकाने योग्य ते शब्द वापरले पाहिजेत. चंद्रकांत पाटील यांनी ज्या दिवशी हे विधान केले त्याच दिवशी सायंकाळी स्पष्टीकरण दिले आहे.