सभापतीचे गाव त्रिशंकू, उपसभापतीच्या गावात भाजप पुरस्कृत सत्तेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:46+5:302021-01-21T04:20:46+5:30
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या सभापती रजनी भडकुंबे यांची हगलूर ग्रामपंचायत त्रिशंकू तर राष्ट्रवादीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत यांच्या कळमण ...
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या सभापती रजनी भडकुंबे यांची हगलूर ग्रामपंचायत त्रिशंकू तर राष्ट्रवादीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत यांच्या कळमण ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत उमेदवारांचा झेंडा फडकला आहे. वडाळा गावावर एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवणाऱ्या बळीरामकाका साठे यांनी भाजपच्या मदतीने नान्नज ग्रामपंचायतीवर सत्ता आणली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यापैकी पाथरी व पडसाळी या दोन ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या हगलूर ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये माजी आमदार दिलीपराव माने गट शिवसेनेचे तीन, जुन्या शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य विजयी झाले. कोणालाही बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती हगलूरची झाली आहे. उपसभापती जितेंद्र शीलवंत यांनी गावपातळीवर राजकीय विरोधी सुनील पाटील गटासोबत एकत्रित येत निवडणूक लढवली. मात्र, गावपातळीवर तरुणांनी एकत्रित येत पाटील-शीलवंत पॅनलची सत्ता उलथवून टाकली. पाटील-शीलवंत गटाला पाच तर भाजप पुरस्कृत पॅनलचे सहा सदस्य विजयी झाले.
वडाळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची १९६५ पासून सत्ता आहे. ती याही निवडणुकीत कायम राहिली. विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत साठे यांची एकहाती सत्ता वडाळा ग्रामपंचायतीवर राहिली आहे. नान्नज ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षे माजी आमदार दिलीपराव माने गट सत्तेवर होता. या निवडणुकीत सत्तांतर झाले; मात्र राष्ट्रवादीला सत्तेसाठी भाजपची मदत घ्यावी लागली.
--
कळमण ग्रामपंचायतीमध्ये राधा क्षीरसागर व दीपक क्षीरसागर हे बहीण- भाऊ एकाच वाॅर्डातून निवडून आले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली; मात्र भाजप पुरस्कृत पॅनलचा त्यांना पाठिंबा होता.
0 सोलापूर बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे हे विरोधी उमेदवार सुदर्शन अवताडे यांची अनामत जप्त करत विजयी झाले.
0 स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद झाल्याने शिवसेनेसोबत आघाडी करत निवडणूक लढविलेले बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर हे नान्नज ग्रामपंचायतीसाठी विजयी झाले. मात्र; ते सत्तेपासून दूर राहिले.
0 वांगीत शारदा पवार व राधा पवार यांना समान ९१ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे राधा पवार या सदस्य झाल्या.