भाजप-सेनेचे नेते विरोधात बोलत होते; पण निवडणुकीत त्यांनी दाखविली एकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:04 PM2019-05-28T12:04:53+5:302019-05-28T12:07:06+5:30
प्रणिती शिंदे याचे स्पष्टीकरण; उणिवा शोधण्याची वेळ नाही, विधानसभेलाही एकदिलाने काम करा
सोलापूर : उणिवा, त्रुटी शोधत बसण्याची ही वेळ नाही. निवडणुकीअगोदर भाजप-सेनेचे नेते एकमेकांविरोधात बोलत होते. पण निवडणुकीत त्यांनी एकी दाखविली, त्याचा त्यांना फायदा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़ आता विधानसभेसाठीही लोकसभेसारखे एकदिलाने काम करायचे आहे, असेही आवाहन यावेळी केले.
निवडणूक निकालानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने लोकसभेचे काम केल्याचे नमूद केले. त्यावर प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला यावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. निवडणूक प्रचार यंत्रणेत आपल्या काही उणिवा होत्या.
भाजपने ज्या पद्धतीने मतदारसंघातील मतदारांचा प्रभाव पाहून प्रयोग केला. त्याप्रमाणे आपणही या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे. भाजपचा उमेदवार लिंगायत समाजाचा आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मागासवर्गीय समाजाकडे आपण लक्षच दिले नाही. तालुक्याच्या जबाबदाºया ज्यांच्यावर दिल्या, त्यांच्या कामाचा आढावा घेणे गरजेचे होते, असे मत मांडले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण सर्वजण एकदिलाने काम केले. उणिवा, त्रुटी शोधत बसण्याची ही वेळ नाही. निवडणुकीअगोदर भाजप-सेनेचे नेते एकमेकांविरोधात बोलत होते. पण निवडणुकीत त्यांनी एकी दाखविली, त्याचा त्यांना फायदा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशाच पद्धतीने आपणही विधानसभेला एकीने काम करायचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी आभार मानताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीला नगरसेवक चेतन नरोटे, प्रवीण निकाळजे, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा सुनीता रोटे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, रामचंद्र पवार, युवराज पवार आदी उपस्थित होते.
शिंदे यांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क
- काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नगरसेवकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाराज होऊ नका, लोकसभेसाठी सर्वांनी चांगले काम केले आहे. सूर्य दररोज वेगळी आशा घेऊन उगवतो. भविष्याचे किरण शोधण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना दिल्या़त्यानंतर सोमवारी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरसेवक व पदाधिकाºयांची काँग्रेस भवन येथे बैठक घेतली.