मोबाईलवर बोलताना रेल्वेच्या सिग्नलला आपटले डोके !
By Admin | Published: August 3, 2016 12:07 PM2016-08-03T12:07:41+5:302016-08-03T12:08:12+5:30
कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसने निघालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला.
>आयटीआय प्रवेशासाठी निघालेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसने निघालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला. वाकाव (ता. माढा) येथे मोबाईलवर बोलत असताना रेंज येत नसल्याने तो रेल्वेच्या दरवाजाजवळ उभा होता. रेल्वे सिग्नलला डोके आपटून तो खाली पडल्याने ही घटना घडल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले.
अक्षय चतुर्भूज बारबोले (वय 22, रा. कल्याणनगर, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. मूळचे माढा तालुक्यातील सीना दारफळ येथील रहिवासी असलेले बारबोले कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने गेल्या 15 वर्षांपासून सोलापुरात राहत आहेत. अक्षयचे वडील होटगी रोडवरील शिवशाही कंपनीत नोकरीला आहेत. कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी अक्षय सकाळी हुतात्मा एक्स्प्रेसने कुर्डुवाडीकडे निघाला होता. वाकाव परिसरात मोबाईलवर बोलत असताना रेंज येत नसल्याने त्याने डोके बाहेर काढले होते. रेल्वे सिग्नलला डोके आपटून तो खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला रेल्वे कर्मचाऱ्यांनी कुर्ला गाडीने कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर आणले. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती कळताच बारबोले कुटुंबीयांना धक्का बसला. कुर्डुवाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अक्षयच्या मागे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.