मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता
By रूपेश हेळवे | Published: November 29, 2023 06:15 PM2023-11-29T18:15:21+5:302023-11-29T18:15:41+5:30
सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि ...
सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर एकमार्गी विशेष दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या शनिवार २ आणि रविवार ३ डिसेंबर रोजी धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर सुपरफास्ट वन वे स्पेशल एकेरी विशेष गाडी रविवार ३ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री १२:३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ८:१० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी येथे थांबा असणार आहे. या गाडीला १७ डबे असून त्यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असणार आहेत.
शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी शनिवार २ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री १२:२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३:३२ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असणार आहे. या गाडीला १७ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असणार आहेत.
या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३० नोव्हेंबरपासून करता येणार आहे. या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.