कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या
By रूपेश हेळवे | Updated: November 18, 2023 14:16 IST2023-11-18T14:15:50+5:302023-11-18T14:16:41+5:30
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या
सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक हे पंढरपूर येथे येत असतात. यासाठी यानिमित्त कार्तिकी एकादशी सणाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पंढरपूर, बिदर, आदिलाबाद, हजूर साहिब नांदेड या अनारक्षित गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बिदर -पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी बिदर येथून बुधवार २२ रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.२० वाजता पोहोचेल. पंढरपूर येथून २३ रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि बिदर येथे दुसऱ्या दिवशी ४.३० वाजता पोहोचेल.या गाडीला भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन आणि कुर्डुवाडी येथे थांबा असणार आहे. या गाडीला २ सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १२ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असणार आहेत. आदिलाबाद -पंढरपूर- हजूर साहेब नांदेड अनारक्षित गाडी बुधवार २२ रोजी आदिलाबाद येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दूसर्या दिवशी ७.३० वाजता पोहोचेल.
ही गाडी २३ रोजी पंढरपूर येथून ८.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ८.४० वाजता नांदेडला पोहोचेल.
नांदेड-पंढरपूर-आदिलाबाद ही स्पेशल नांदेड गाडी २६ रोजी ७.२० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता पोहोचेल. हीच गाडी पंढरपूर येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. यागाडीला कुर्डुवाडी, बार्सी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा आणि मुदखेड, भोकर, हदगाव रोड, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, धानोरा (डेक्कन), बोधडी बुरुग आणि किनवट येथे थांबा असणार आहे. यागाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणी असणार आहेत.