माऊली...माऊली...! अकलूजमध्ये पार पडला नेत्रदीपक रिंगण सोहळा; अभूतपूर्व सोहळ्याने वारकरी सुखावले
By Appasaheb.patil | Published: July 12, 2024 12:55 PM2024-07-12T12:55:28+5:302024-07-12T12:56:40+5:30
अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली.
दरम्यान, भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.
पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासू पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली.