वाखरी पालखी तळावरील कामांना गती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:53+5:302021-07-14T04:25:53+5:30
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार ...
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार असला तरी या सोहळ्यासाठी वाखरी पालखी तळावर येणाऱ्या मानाच्या प्रमुख दहा पालख्या व त्यामधील भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.
स्वच्छता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, चौथऱ्यांची दुरुस्ती ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
प्रत्येक वर्षी वाखरी पालखी तळावर सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. त्यासाठी प्रशासनाची मोठी तयारी असते. प्रत्येक वर्षी पायी चालत येणारे पालखी सोहळे गतवर्षीपासून मानाच्या संतांच्या पादुका घेऊन एसटी बसने वाखरीत येत आहेत. त्या ठिकाणी विसावा, भोजन, भजन कीर्तन झाल्यानंतर हे सर्व प्रातिनिधिक मोजके वारकरी पादुका घेऊन पंढरपूरला किमान ५ किमी चालत जाणार आहेत.
वाखरी पालखी तळावर काटेरी झुडपे तोडने, गवत काढून स्वच्छता केली जात आहे. पालखी तळावर पाणीपुरवठ्यासाठी असलेली स्टँडपोस्ट दुरुस्त केली जात आहेत. हायमास्ट दिवे सुरू केले आहेत. मानाच्या पालख्यांसाठी स्वतंत्र मंडप तयार केले जात आहेत. ज्या ठिकाणी चिखल होण्याची शक्यता आहे, आशा ठिकाणी कचखडी टाकली जाणार आहे. आजूबाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून ते दुरुस्त केले जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पालखी तळावर २४ तास पोलिसांची गस्त
पालखी तळाला बॅरिकेडिंगने बंदिस्त करण्यात आले आहे. तळावर स्वच्छता करून हायमास्ट दिवे सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांकडून टप्प्याटप्प्याने गस्त ासुरू केली आहे.
--
फोटो :
वाखरी पालखी तळावर वीज वितरणकडून हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती सुरू आहे.