आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:16 PM2020-07-21T12:16:49+5:302020-07-24T07:55:38+5:30

व्रतवैकल्याचा महिना; कोरोनाच्या सावटाखाली घराघरात साजरे होणार सण

Spiritual special; Shravan recharging devotion from today | आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...!

आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...!

Next

सोलापूर : निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवित श्रावण जसा सर्वांना मोहित करतो तसा विविध सण, व्रतांमुळे तो प्रत्येकाचा भक्तिभावही वाढीस लावत असतो. त्यामुळे या महिन्याचे पावित्र्य मोठे असून, या श्रावण मासास उद्यापासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मात्र आपल्या घरातच भक्तिभाव रिचार्ज करावा लागणार आहे.

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्यात कुलधर्म कुलाचाराला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरातच आपल्या कुलदैवतेनुसार श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार आणि श्रावण शनिवारचे व्रत केले जाते.

 यंदा श्रावण शनिवार हा नागपंचमीचा सण घेऊन येत असून, या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. विशेष म्हणजे नागपंचमीनिमित्त सासुरवासिनी माहेरी येतात व मंगळागौरीच्या व्रतासाठी महिनाभर आपले आई, वडील व बहीण, भावांसमवेत राहतात; पण यंदा कोरोना काळ असल्याने सर्वत्र शहरबंदी, गावबंदी झाली आहे. त्यामुळे आपल्या सख्यांना भेटण्यासाठी सासुरवासिनी माहेरी येऊ शकल्या नाहीत.

बहीण-भावाचा नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन तो ३ आॅगस्ट रोजी साजरा होत आहे. यंदा या सणावरही महामारीचे सावट आहे. सोलापुरातील संचारबंदी २६ जुलै रोजीच्या मध्यरात्री संपणार असल्यामुळे बहिणींना आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. श्रावण महिन्यातील ११ व १२ आॅगस्ट हे दोन दिवस महत्त्वाचे असून, या दिवशी अनुक्रमे जन्माष्टमी व गोपाळकाला साजरा होत आहे. चौकाचौकात बांधल्या जाणाºया दहीहंडी व ते फोडणारे गोविंदांचे पथक मात्र यंदा पाहायला मिळणार नाही.

श्रावण मासाची सांगता दर्श पिठोरी अमावस्येला होते. या दिवशी बैलपोळा साजरा होत आहे. बळीराजाच्या शेतात राबणाºया सर्जाराजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून शेतकरी त्याची मनोभावे पूजा करतात. तत्पूर्वी बैलांची सजावट करून गावातून मिरवणूक काढली जाते.

श्रावणातील सण

  • - शनिवार २५ जुलै - नागपंचमी
  • - गुरुवार ३० जुलै - पुत्रता एकादशी
  • - सोमवार ३ आॅगस्ट - रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा)
  • - मंगळवार ११ आॅगस्ट - श्रीकृष्ण जयंती
  • - बुधवार १२ आॅगस्ट - गोपाळकाला
  • - मंगळवार १८ आॅगस्ट - पोळा

अन्य सण

  • - शनिवार १ आॅगस्ट - बकरी ईद
  • - शनिवार १५ आॅगस्ट - पारसी दिन

राष्ट्रीय सण

  • शनिवार १५ आॅगस्ट - स्वातंत्र्य दिन

Web Title: Spiritual special; Shravan recharging devotion from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.