पंढरीतील दर्शन रांगेतील भाविकांना स्प्रिंकलर, कुलरचा थंडावा; दर्शन रांगेत थांबणाऱ्यांसाठी पत्राशेड उभारणी
By रवींद्र देशमुख | Published: April 16, 2024 06:18 PM2024-04-16T18:18:19+5:302024-04-16T18:19:07+5:30
चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सोलापूर : चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत थांबणाऱ्या भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत स्कायवॉकपासून पत्राशेडपर्यंत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी ४ पत्राशेड येथे तात्पुरते ३, असे एकूण ७ पत्राशेड उभारण्यात आले आहेत.
चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा-खिचडी वाटप करण्यात येत आहे.
वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पत्राशेडमध्ये कुलर, फॅन व यंदा प्रथमच थंडाव्यासाठी स्प्रिंकलर बसविण्यात येत आहेत. तसेच मंदिर परिसरात रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, हिरकणी कक्ष, चेंजिंग रुम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हिडीओकॉन व विठ्ठल रुक्मिणी या ३ भक्तनिवासामधील ३६१ रुममध्ये सुमारे १६०० भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आल्याचे शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून...
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. भाविक एकादशीनिमित्त उपवास करत असतात. उन्हामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन, भाविकांची प्रकृती बिघडू नये, भाविकांना अस्वस्थ वाटू नये. दर्शन रांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत/मठ्ठा व तांदळाची/साबुदाण्याची खिचडी व गोड बुंदी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून मिनरल वॉटर, चहा, खिचडी, अन्न प्रसादही मंदिर समितीकडून देण्यात येणार आहे.