सोलापूर जिल्ह्यातील एस-टी ची सेवा सुरू, बसस्थानक वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:46 AM2017-10-21T11:46:42+5:302017-10-21T11:47:06+5:30
मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़
सोलापूर आॅनलाइन लोकमत
सोलापूर दि २१ : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़
सातवा वेतन आयोगा लागू करावा या मागणीसाठी एस-टी कर्मचाºयांच्या संघटनेने मागील चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला होता़ प्रवाशांची हेळसांड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती़ खासगी प्रवास गाड्यांचा आधार घेत प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, पोलीस व परिवहन मंडळाने घेतला होता़ एसटी कर्मचाºयांच्या संपाचे चार दिवस पूर्ण झाले़ गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातील एसटी सेवा पूर्णत: ठप्प होती़ यामुळे ऐन दिवाळीच्या सणात सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला़
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आला़ शनिवारी सकाळपासून सोलापूर बसस्थानकावरून गाड्यांची थोड्या प्रमाणात वर्दळ दिसत होती़ मात्र दहानंतर गाड्यांच्या प्रमाणात वाढ झाली़ त्यामुळे एसटी बसस्थानक थोड्या प्रमाणात गजबजलेले होते़ शनिवारी सकाळी प्रारंभीच्या वेळेस केवळ मुक्कामासाठी असलेल्या गाड्या आज परत गेले आहेत़ पहिल्या दोन तासांत केवळ पाच गाड्या सुटल्या होत्या अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली़
----------
फोनवरून वाहक-चालकांना बोलाविणे सुरू़
चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे वाहक व चालक आपल्या घरी गेले होते़ मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर आहे तात्काळ कामावर रूजू व्हा असे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून संपावर गेलेले वाहक-चालक तात्काळ कामावर हजर झाले़ त्यामुळे शनिवारी सकाळपासून सोलापूर बसस्थानकावरून एसटी सेवा सुरू झाली़ नियमित व वेळेवर गाड्या सोडण्यासाठी बसस्थानक प्रशासन वाहक-चालकांना दुरध्वनीवरून संपक साधून कामावर हजर राहण्याच्या सुचना देत आहेत़