सोलापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून एस.टी. बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:30 AM2020-06-08T11:30:11+5:302020-06-08T11:32:46+5:30
सोलापूरलाही मिळाली परवानगी; कोरोना वॉरियर्स चालक, वाहक सज्ज
सोलापूर : गेली अडीच महिने राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील सर्वच आगारांमध्ये जागीच थांबलेल्या एस. टी. बस आता सोमवार दि. ८ जूनपासून धावणार आहेत; याचबरोबर सोलापूर आगारातूनही बस सोडण्याचा निर्णय रात्री उशिरा झाला असल्याचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या प्रतीक्षेत बसलेले चालक अन् वाहक कोरोना वॉरियर्स म्हणून सज्ज झाले आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी एसटी सेवा पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारपासून सोलापूर विभागातील सर्व आगारातून एस. टी. गाड्या धावण्यास सुरुवात करणार आहे. यासाठी आगारांनी नियोजनही केले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन जादा एस. टी. गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत सर्व अधिकार स्थानक प्रमुखांना देण्यात आले आहेत.
२२ मे रोजी सोलापूर विभागातील आठ आगारातून गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. तेव्हा हवे तेवढे प्रवासी मिळत नसल्याने काही भागातील गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी एक-दोन प्रवाशांना घेऊन एस. टी. गाड्या धावल्या. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सोमवारपासून काही मोजक्याच गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. काही आगारांमधून तालुक्यांतर्गत गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाला सोलापूरला यायचे असेल तर अशा प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे. सोलापूर आगारातूनही गाड्या सोडण्याचे लवकर नियोजन करण्यात येणार असल्याचे संकेतही मिळत आहेत.
एकावेळी २२ प्रवाशांनाच करता येणार प्रवास
- प्रत्येक एस. टी. बसमध्ये जास्तीत-जास्त २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर एका सीटवर एका प्रवाशास बसता येणार आहे. चालकाच्या हाती गाडी देताना पूर्ण सॅनिटायझर करून देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीनंतर गाडी स्वच्छ केली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सवलतीचे पास बंद असणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांच्या आतील मुलांना प्रवास करता येणार नाही.
शासनाने दिलेल्या सर्व सूचना पाळून एसटी प्रशासनाच्या वतीने सोमवारी एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाºयांना विविध सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचबरोबर प्रवाशांनीही आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवास करावा.
-रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक