एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी
By काशिनाथ वाघमारे | Updated: March 25, 2024 22:22 IST2024-03-25T22:22:02+5:302024-03-25T22:22:34+5:30
याबाबत बबन सोमनाथ मुंढे (वय ४५, रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी
सोलापूर : बार्शीहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बसची मोटारसायकलस्वारास जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात २५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.३० सुमारास पांगरी येथे उक्कडगाव चौकात झाला. रामभाऊ राजाराम सांगळे (वय ७०, रा. उक्कडगाव, ता. बार्शी) असे उपचारापूर्वी मरण पावलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. या अपघातात त्यांच्या पत्नी कमल सांगळे (वय ६५) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत बबन सोमनाथ मुंढे (वय ४५, रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बबन मुंढे यांचे मेव्हुणे रामभाऊ सांगळे व बहीण कमल हे पती-पत्नी मोटारसायकल (एम.एच. १३ / सी. एन. ७२०८) वरून बार्शीकडे निघाले होते. दरम्यान, बार्शीहून लातूरकडे जाणारी एसटी बस (एम.एच. २० / बी. एल. २५७३) च्या चालकाने वाहन वेगात चालवत समोर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता रामभाऊ यांना डोक्यास जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पत्नी कमल रामभाऊ सांगळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश दळवी करत आहेत.