सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना कन्नड पोलिसांनी सीमेवर रोखले
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 25, 2022 09:18 PM2022-11-25T21:18:10+5:302022-11-25T21:18:53+5:30
कर्नाटक हद्दीत प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले.
सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद आता एसटीच्या प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे. कर्नाटकातमहाराष्ट्रातील एसटी वाहनांना विरोध होत असून तिथे असुरक्षिता निर्माण झाली आहे. त्यामुळे कन्नड पोलिसांनी सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना अक्कलकोटच्या सीमाभागात रोखले. शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान एकूण पाच गाड्यांना कर्नाटकात जाण्यास मज्जाव केला गेला. त्यामुळे सोलापुरातील प्रवाशांनी कर्नाटक सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
कर्नाटक हद्दीत प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले. त्यानंतर प्रवासी जीपने गुलबर्ग्याकडे रवाना झाले. सोलापूर-गुलबर्गा मार्गावरील हिरोळी सीमेजवळ तीन गाड्या तसेच दुधनीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन गाड्यांना कन्नड पोलिसांनी रोखले. साधारण ८२ प्रवाशांची गैरसाेय झाली. या घटना घडल्यानंतर एसटीचे अधिकारी सतर्क झाले असून शनिवारी कनार्टकमधील परिस्थिती पाहून सोलापुरातून गाड्या रवाना होतील. शुक्रवारसारखी परिस्थिती राहिल्यास सोलापुरातून गाड्या जाणार नाहीत, अशी माहिती अक्कलकोट आगाराचे व्यवस्थापक रमेश म्हंता यांनी ‘लोकमत’ला दिली.