एसटी वेळेवर येत नाही, कॉलेजला रोजच होतो उशीर, अमित ठाकरेंसमोर विद्यार्थ्यांने मांडली व्यथा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 4, 2023 12:34 PM2023-02-04T12:34:43+5:302023-02-04T12:35:28+5:30
परीक्षेच्या वेळी तीन-चार तास आधीच घराबाहेर पडावे लागत असल्याचंही त्याने सांगितलं
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: ग्रामीण भागात एसटी पोहोचते. परंतु एसटीचे चालक वेळापत्रक पाळत नाहीत. एसटीला रोजच उशीर होतो. त्यामुळे कॉलेजचा पहिला तास हमखास बुडतो. परीक्षेच्या वेळी मात्र तीन ते चार तास आधी घराबाहेर पडावे लागते, अशा तक्रारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.
अमित ठाकरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. येथील शासकीय विश्रामगृहात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुपारी साडेबारा वाजता बैठक झाली. दुपारी साडेचार पर्यंत बैठक चालली. विद्यार्थी महासंपर्क अभियानांतर्गत अमित ठाकरे हे सोलापुरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. शहर व ग्रामीण भागातून यास चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी साडे पाच वाजता दयानंद कॉलेज येथे ठाकरे यांच्याहस्ते विद्यार्थी सेनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन झाले.