किरकोळ दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एस.टी.ची दिवसाकाठी सहा लाखांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:40 PM2022-04-07T17:40:08+5:302022-04-07T17:40:17+5:30
चार ते पाच दिवसांची क्रेडिट : दहा दिवसांतच ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम वाचली
सोलापूर : सध्या तोट्यात धावत असलेल्या एस.टी. महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी खर्च कमी करण्याचे धोरण एस.टी. महामंडळाने अवलंबले आहे. यानुसार घाऊक दरात डिझेल खरेदी करीत असल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत असल्याचे लक्षात आले. होणारे नुकसान टाळण्यासाठी आता किरकोळ दरात डिझेल खरेदी केली जात आहे. त्यामुळे महामंडळाला लीटरमागे जवळपास दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत बचत होत आहे. या माध्यमातून जवळपास दिवसासाठी सहा लाख रुपयांची बचत सोलापूर विभागातून होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर विभागात दिवसाला जवळपास दोन ते तीन टँकर डिझेल रोज लागत होते; पण सध्या किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचे ठरविण्यात आले. यानुसार २६ मार्चपासून सोलापुरात खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्यात येत आहे. यासाठी निवड केलेल्या डिझेल पंपांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून, ते दैनंदिन लेखाजोखा मांडत आहेत. सध्या सोलापूर आगारात पुणे रोडवरील विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपाची निवड करण्यात आली आहे. या पंपावर महामंडळाला रोजच्या दरापेक्षा ५० पैसे कमी दर एस.टी. महामंडळाला मिळत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आकडेवारीवर एक नजर...
- एकूण बसेस - ६००
- एकूण दिवसाकाठी लागणारे डिझेल - २५००० लिटर
- पंप - ९ पंपाची निवड
नऊ पंपांची निवड
सोलापूर जिल्ह्यात एकूण नऊ आगार आहेत. या नऊ आगारांत प्रत्येकी एक असा जिल्ह्यातून नऊ डिझेल पंपांशी करार करण्यात आला आहे.
लिटरला होत आहे वीस रुपयांची बचत
एस.टी. महामंडळाने घाऊक व किरकोळ दरांत होणाऱ्या तफावतीमुळे डिझेल किरकोळ दरात खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सध्या डिझेल किरकोळ दरात खरेदी केले जात आहे. यामुळे एस.टी. महामंडळाचे लीटरला जवळपास वीस ते पंचवीस रुपये वाचत आहेत. या माध्यमातून एस.टी. महामंडळाला दिवसाकाठी जवळपास सहा लाख रुपयांची बचत होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.