मुंबईत गेलेल्या एसटी गाड्या नाही आल्या; ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद झाल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:01 PM2020-12-02T17:01:09+5:302020-12-02T17:02:10+5:30
कर्मचारी बसूनच : पुढच्या आठवड्यात गाड्या येण्याची शक्यता
सोलापूर : ‘बेस्ट’च्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून १०० गाड्यांसह चालक, वाहक, मेकॅनिक मुंबईत दाखल झाले. तेथील सेवा बजावून कर्मचारी सोलापुरात दाखलही झाले; मात्र तेथे गेलेल्या १०० गाड्या अद्याप आल्याच नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद झाल्या आहेत.
एस. टी. कर्मचारी संघटनांनी विरोध केल्यामुळे मुंबईत गेलेल्या कर्मचाऱ्यांना सोलापुरात पाठवण्यात आले. त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनानेही कोरोनाचा धागा पकडून वाहक, चालक, मेकॅनिक आदींना मुंबईतून कार्यमुक्त केले. गेलेले कर्मचारी पुन्हा सोलापुरात आले. त्यातच एस. टी. सेवा सुरळीत झाली. एकीकडे ग्रामीण भागातील फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे १०० एस. टी. गाड्या अद्याप मुंबईतच अडकून पडल्या आहेत. लॉकडाऊननंतर सोलापूर विभागातील फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. मुंबईत अडकलेल्या एस. टी. गाड्या सोलापुरात आल्या तरच ग्रामीण भागातील फेऱ्या वाढणार आहेत. आज ना उद्या या एस. टी. गाड्या येतील, तोपर्यंत ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या कमी आहे, त्या मार्गावरील फेऱ्या बंद करण्यात आल्याचे एस. टी. प्रशासनाने सांगितले.
पुढच्या आठवड्यापासून फेऱ्यांमध्ये वाढ होईल
सोलापूर विभाग हे पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही़; पण सेवा पूर्वपदावर येत आहे़ यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यापासून फेऱ्यांमध्ये वाढ होईल. यानुसार आपल्या विभागाच्या गाड्या परत मिळाव्या, यासाठी आम्ही मागणी करत आहोत, असे विभाग नियंत्रक दत्तात्रय चिकर्डे यांनी सांगितले.