सोलापुरातील महापालिकेत जेवणानंतर सवडीने येतात कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:45 PM2019-06-12T12:45:52+5:302019-06-12T12:49:50+5:30
Lokmat Sting Operation; लिपिक दुपारनंतरच येतात, बारा कर्मचाºयांची नियुक्ती असताना नऊ जण गायब
सोलापूर : शासनाने शासकीय कर्मचाºयांना दुपारच्या जेवणाची सुटी फक्त अर्ध्या तासासाठी केली असली तरी कर्मचाºयांना याबाबत काही देणे-घेणे नसल्याचे महापालिकेतील विविध खात्यांच्या पाहणीत आढळले.
लोकमत चमूने मंगळवारी दुपारी दोन वाजता महापालिकेच्या जन्म-मृत्यू, आरोग्य, करसंकलन, संगणक, कामगार कल्याण, सफाई गलिच्छ वस्ती विभागात जाऊन पाहणी केली असता कर्मचाºयांच्या सवयी निदर्शनाला आल्या. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच जन्म-मृत्यू नोंद विभागाचे कार्यालय आहे. दुपारी दीड वाजता जेवणाची सुटी झाल्यावर दाखला वितरित करणारे कर्मचारी जेवणासाठी बाहेर पडल्याचे दिसले. फक्त एक महिला व दोन पुरुष कर्मचारी जागेवर बसून होते.
समोरच्या घड्याळात दोन वाजले तरी कार्यालयात हजर राहण्याची तसदी या कर्मचाºयांनी घेतली नाही. समोरच्या काऊंटरवर व प्रवेशद्वारावर लोक दाखल्यासाठी थांबून होते. कार्यालयात १२ कर्मचाºयांची नियुक्ती असताना ९ जण गायब होते. दाखल्यासाठी आलेले नागरिक उपनिबंधक संदीप कुरडे कुठे आहेत, अशी विचारणा करीत होते. पण प्रश्नाला उत्तर देण्याची तसदीही उपस्थित कर्मचाºयांनी घेतली नाही.
जन्म-मृत्यू नोंद कार्यालयाच्या बाजूलाच करसंकलन काऊंटर आहे. या ठिकाणीही फक्त दोन कर्मचारी उपस्थित होते. बाजूला असलेल्या शहर कार्यालयात केवळ तीन वसुली क्लार्क काम करीत बसले होते. करसंकलन प्रमुखांचे कार्यालय बंद होते. जीना चढून हद्दवाढ कार्यालयात गेल्यावर टाकळीकर व इतर चार क्लार्क काम करीत बसले होते. करवसुलीसाठी बिले अद्याप मिळाली नाहीत. त्यामुळे नवीन मिळकत नोंदी व थकबाकीचे काम करीत बसलो असल्याचे त्यांनी सांगितले. इतर लिपिक दुपारनंतरच येतात, असे सांगण्यात आले. संगणक विभागात दोन कर्मचारी होते. विभागप्रमुख स्नेहल चपळगावकर बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. भूमी मालमत्ता व पाणीपुरवठा विभागात कर्मचारी बाजूलाच जेवण करीत असल्याचे दिसून आले. कामगार कल्याण कार्यालय व स्वच्छता विभागात काही कर्मचारी जेवण करीत असल्याचे चित्र दिसून आले.
बरेच कर्मचारी घरी
- दुपारी दीड ते दोन या वेळेत जेवणाची सुटी असते. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कर्मचाºयांना जेवणाच्या सुटीत कार्यालयातच डबा आणण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे अनेक कर्मचारी सकाळी कामावर येतानाच सोबत डबा आणताना दिसत होते. पण सध्या हे चित्र दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. विभागप्रमुख डबा घेऊन येतात. बरेच कर्मचारी पुन्हा पूर्वीच्याच सवयीत रमल्याचे दिसून आले. जेवणाच्या सुटीत बाहेर गेलेले कर्मचारी सुटीची वेळ संपली तरी टेबलावर दिसत नसल्याने कामानिमित्त येणाºया लोकांची गैरसोय होत असल्याची कैफियत रफिक शेख यांनी मांडली.