लसीसाठी मध्यरात्रीपर्यंत ताटकळत बसले कर्मचारी; मेगा लसीकरणाला झाला उशीराने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 08:50 AM2021-09-11T08:50:16+5:302021-09-11T08:51:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यासाठी दोन लाख लसीचे डोस आल्याने शनिवारी मेगा लसीकरण शिबिर राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले, मात्र मध्यरात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांच्या हाती लस देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज प्रत्यक्ष लसीकरणास उशिराने सुरुवात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी आता पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत असून शुक्रवारी दोन लाख डोस प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी एकाच दिवसात ही लस संपेल असे लसीकरणाचे शुक्रवारी नियोजन केले होते. त्याप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरणाचे काम व्यवस्थितरीत्या पार पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नियोजनाप्रमाणे वेळीच लसीकरण करण्यासाठी उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी लस ताब्यात घेण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या आवारातील जिल्हा आरोग्याच्या लसीकरण भांडारात आले, पण मध्यरात्री बारा वाजेपर्यंत या भांडाराला कुलूप होते. कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना संपर्क साधूनही लवकर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागले. लस उशिरा ताब्यात मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी सत्र वेळेत सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या, अशा अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
नियोजन करूनही हा गोंधळ उडाल्यामुळे लसीकरणातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या 150 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 350 ठिकाणी आज लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. लशीकरण्याला गर्दी पडेल म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले आहे.