पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:14+5:302020-12-05T04:41:14+5:30
सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार लंपी स्किन डिसिजन आजारामुळे बंद केला होता. शेतकरी,व्यापारी बांधवांच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक ...
सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार लंपी स्किन डिसिजन आजारामुळे बंद केला होता. शेतकरी,व्यापारी बांधवांच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना निवेदन देऊन बाजार सुरु करण्याची मागणी केली आहे. मार्चपासून कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते. हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.
दरम्यान, सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात मिरज, कराड, पेठ वडगाव, मुरगुड, मोडनिंब, वैराग, बार्शी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदींसह परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी दर आठवड्याला जनावरांसह खरेदी-विक्रीसाठी दाखल येतात. प्रत्येक बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
गेल्या नऊ महिन्यांपासून हा आठवडा बाजार बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यापारी व शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी मध्यंतरी जनावरांचा आठवडा बाजार सुरू केला होता; मात्र स्कीन डिसिजन आजारामुळे बंंद केला आहे. शेतकरी व व्यापारी बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बंद केलेला जनावरांचा आठवडा बाजार तत्काळ सुरू करावा अशी शेतकरी अन् व्यापाऱ्यांची मागणी आहे.
यावेळी रामचंद्र वाघमोडे, बाबुराव सोपे, शिवाजी हजारे, योगेश थोरबोले, सत्यवान गडदे, बापू गावडे, तुषार वाघमोडे, सचिन वाघमोडे, दीपक कांबळे, भिवाजी गावडे, जयवंतराव जगताप, रामचंद्र फडतरे, सतीश सावंत, रावसाहेब शिंदे, प्रकाश सावंत, दिनकर लांडगे, शिवाजी चौगुले, भगवान साळुंखे, सलीम मुंडे, प्रकाश साळुंके, हनुमंत साळुंखे, आबासो गेजगे, विष्णुपंत गेजगे, रमेश गेजगे आदींसह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
------