दीड दिवसाच्या विसर्जनास सुरुवात, महापालिकेकडून तयारी, निर्माल्यासाठी व्यवस्था
By शीतलकुमार कांबळे | Published: September 20, 2023 01:17 PM2023-09-20T13:17:10+5:302023-09-20T13:17:22+5:30
महापालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर : दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जनास सोलापूर शहरात सुरुवात झाली आहे. यासाठी छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर तलाव येथे तयारी करण्यात आली आहे. बुधवार 20 सप्टेंबर रोजी दुपारपासून भाविक विसर्जनास येत आहेत.
महापालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन कुंड स्वच्छ करून त्यामध्ये स्वच्छ पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. भाविकांनी तलावामध्ये मूर्ती विसर्जित करू नये, यासाठी महापालिकेतर्फे मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तलाव परिसरात करण्यात आली आहे.
जे भाविक तलावामध्ये विसर्जनात जात आहेत त्यांना थांबून विसर्जन कुंडातच विसर्जन करण्याची विनंती करण्यात येत आहे. विसर्जन कुंडाच्या बाजूलाच महापालिकेतर्फे निर्माल्य जमा करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविका आधी निर्माल्य बाजूला काढून ठेवत असून मूर्ती विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करीत आहेत. यासाठी महापालिकेचे कर्मचारी भाविकांना सहकार्य करत आहेत. यासोबतच ज्या भाविकांनी पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) गणेश मूर्ती घेतली आहे,असे भाविक घरीच श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत.