सोलापुरात 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'चा जयघोष; सिद्धेरामेश्वर यात्रेस प्रारंभ
By Appasaheb.patil | Published: January 13, 2023 11:59 AM2023-01-13T11:59:48+5:302023-01-13T12:04:48+5:30
तैलाभिषकासाठी मानाचे सातही नंदीध्वज मार्गस्थ; मिरवणुकीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन
सोलापूर : "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र..." च्या जयघोषात शुक्रवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला. तैलाभिषकासाठी मानाचे सातही नंदीध्वज ६८ लिंगांना आज प्रदक्षिणा घालणार आहेत. सकाळी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यातून मिरवणूकीने सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले.
सकाळी ९ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा झाली. पूजा झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर श्री सिद्धेश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ १ ते ७ नंदीध्वज येऊन उभारल्यानंतर सरकारतर्फे देशमुख हे हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करण्यात आला. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. तिथून हे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात ६८ लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात.
दरम्यान, पूजा झाल्यानंतर त्याठिकाणी शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात. त्यानंतर देशमुख, मसरे, कळके, बहिरोपाटील, भोगडे, थोबडे, सिद्धय्या स्वामी, मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील, शिवशेट्टी, गवसणे, इटाणे (पूजेचे मानकरी, झोळीवाले मानकरी) यांना विडा दिला जातो. हा सर्व विड्यांचा मान हिरेहब्बू देतात. त्यानंतर ६८ लिंगास यन्नीमज्जन (तैलाभिषेकांस) प्रारंभ होतो. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा हिरेहब्बू करतात. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात.